तीन वर्षांनी पेटले केडीएमसी मुख्यालयातील सौर उर्जेचे दिवे!

तीन वर्षांनी पेटले केडीएमसी मुख्यालयातील सौर उर्जेचे दिवे!

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या आवारात काही वर्षांपूर्वी बसवण्यात आलेले व राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले सौर उर्जेवर चालणारे दिवे गेल्या सुमारे तीन वर्षांपासून बंद स्थितीत होते. त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिकेच्या विद्युत विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. मात्र तीन वर्षांनी हे दिवे चालू करण्यास महापालिका प्रशासनाला सवड मिळाल्याचे दिसून येत आहे.

सौर उर्जेचा वापर करण्यास शासनाकडून सरकारी-निमसरकारी विभागांना तसेच नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राबविले जात आहे. नव्या गृहसंकुलांमध्ये सौर उर्जेचा अधिकाधिक वापर केल्यास विकासकांना प्रोत्साहन देण्याची योजना देखील आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या मालमत्ता असलेल्या ठिकाणी सौर उर्जेवर चालणारे दिवे बसविण्यात आले होते. यात मुख्यालयाच्या आवारात ६-७, तसेच इतर प्रभाग क्षेत्र कार्यालयांमध्ये देखील सौर उर्जेचे दिवे बसविण्यात आले होते. महापालिकेच्या या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून गौरविण्यात आले होते. तत्कालीन उपमहापौर बुधाराम सरनोबत व महापालिका अधिकाऱ्यांनी दिल्ली येथे जाऊन सदरचा पुरस्कार स्वीकारला होता.

कालांतराने महापालिका मुख्यालयाच्या आवारातील सौर उर्जावरील हे दिवे देखभाल-दुरुस्ती अभावी बंद पडले. तब्बल तीन वर्षांनी महापालिकेच्या विद्युत विभागाला हे दिवे चालू करण्यास सवड मिळाल्याचे दिसत असून मंगळवारी महापालिका मुख्यालयाच्या आवारातील सौर उर्जेचे दिवे उजळल्याचे पहावयास मिळाले. सध्या महापालिका प्रशासनाकडून मराठी भाषा संवर्धन सप्ताह राबविण्यात येत असून यानिमित्ताने महापालिका आवारात मराठी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांना सायंकाळच्या वेळेत हे सौर उर्जेचे उजळणारे दिवे पहावयास मिळणार आहेत.