आदित्य सूर्यनारायण शिबिराला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

आदित्य सूर्यनारायण शिबिराला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

कल्याण (प्रतिनिधी) :

येथील हभप सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातल्या स्व. सुरेंद्र वाजपेयी सभागृहात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे देखणे असे आदित्य सूर्यनारायण शिबिर संपन्न झाले. या शिबिराला विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा उस्फूर्त सहभाग लाभला. सदर शिबिरात १३ शाळांमधून ४७२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चारासह उपस्थित ४७२ विद्यार्थ्यांनी १२ सूर्यनमस्कार घातले. बलशाली व स्वस्थ भारताच्या निर्माणाचा संकल्प करून शैलेश कुवळेकर यांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रात काम करणार्‍या ४५ कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक कार्यातून हे शिबिर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात नियोजनपूर्ण व शिस्तबद्धरीत्या संपन्न झाले. जास्वंदी बेंद्रे व सौमित्र यादव या तरुणांनी प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार घालून घेतले. विवेक ताम्हणकर यांचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिबिरास लाभले. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीच्या महाराष्ट्र योग विभागप्रमुख मंगला ओक उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे महत्त्व समजावून सांगितले.

कुंदा मावळकर, रोटरी क्राऊन सिटीचे अजय चौधरी, स्वप्नील गायकर, रोटरी क्लबचे राजन म्हात्रे, केडीएमसीचे विरोधी पक्षनेता मंदार हळबे या मान्यवरांची या शिबिराला उत्स्फूर्त उपस्थिती व सहकार्य लाभले. रवींद्र वैद्य, अपूर्वा बुचके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १ महिन्याच्या अल्पावधीत हे शिबिर यशस्वी केले. एखाद्या कार्यामागे सत्संकल्प, निःस्वार्थता व कार्यकर्त्यांमध्ये परस्पर सामंजस्य, आत्मविश्‍वास व जिद्द असेल तर असे कार्य पूर्णत्वाला जाते हे या शिबिराने सिद्ध केले आणि यातूनच शिबिराची यशस्विता साधली गेली.