क्लस्टर योजना व डीम कन्व्हेयन्सबाबत श्रीनिवास घाणेकर यांचे कल्याणकरांना मार्गदर्शन

क्लस्टर योजना व डीम कन्व्हेयन्सबाबत श्रीनिवास घाणेकर यांचे कल्याणकरांना मार्गदर्शन

कल्याण (प्रतिनिधी) : क्लस्टर योजना कल्याण-डोंबिवलीमधे यावी यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा या विषयाचे अभ्यासक श्रीनिवास घाणेकर यांनी कल्याण पूर्व येथे क्लस्टर योजना व डीम कन्व्हेयन्सबाबत आयोजित व्याख्यानाप्रसंगी उपस्थित नागरिकांना अत्यंत सोप्या भाषेत योजनेची उपस्थितांना माहिती दिली. क्लस्टर योजना व डीम कन्व्हेयन्सबाबत चर्चासत्राचे आयोजन कल्याण पूर्वेत कल्याण विकासिनीतर्फे करण्यात आले होते. त्यावेळी घाणेकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले.

घाणेकर यांनी याप्रसंगी क्लस्टर योजना व त्यामधील बारकावे समजावून सांगितले. उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. अनेक प्रश्नांना त्यांनी हात घातला, किती वर्ष जुने रहिवासी या योजनेत सहभागी होतील. चाळीतील सर्वांना याचा लाभ मिळेल का? भाडेकरूंना सहभागी होता येईल का? छोटे दुकानदार, लहान घरे यांना किती चौ.फुट घरे मोफत मिळतील. किती वर्षात पूर्ण पुनर्विकास होवू शकतो? रहिवासी यांची राहण्याची व्यवस्था कशी होईल, आदी महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे उपस्थितांना घाणेकर यांनी दिली. 

त्याच बरोबर डिम कन्व्हेयन्स बाबतही कल्याण पूर्वेतील अनेक हौसिंग सोसायटी सदस्य आणि पदाधिकारी यांना शंका व प्रश्न होते. त्याबाबतही कल्याण विकासिनीचे अॅड. उदय रसाळ यांनी डिम कन्व्हेयन्स आणि कन्व्हेयन्स बाबत संपूर्ण प्रक्रिया टप्या टप्याने समजावून सांगितली. महाराष्ट्र सरकारने नव्याने मंजूर केलेला युडीपीसीआर नुसार कल्याण डोंबिवलीकरीता लागू झालेली क्लस्टर योजना कल्याण पूर्वे सारख्या अविकसित, दाटीवाटीच्या चाळी, जुन्या इमारती, धोकादायक इमारती, अरुंद, रस्ते, रस्ता रुंदीकरणात घरे दुकाने यांच्या पुनर्वसनाची अडचणी याबाबत ही योजना दिलासादायक ठरू शकते. कल्याण पूर्वचा चेहरा मोहरा बदलू शकतो. म्हणून इथल्या नागरिकांचे या योजनेबाबत प्रबोधन व जाणीव जागृती करण्याकरीता सदरचे व्याख्यान आयोजित केल्याचे आयोजक रसाळ यांनी सांगितले.