चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ सज्ज

चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ सज्ज

मुंबई ( प्रतिनिधी) :
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने दरवर्षाप्रमाणे या वर्षीही विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. नोकरी-धंद्यानिमित्त कोकणातील लाखो कुटुंबे मुंबई-ठाणे परिसरात स्थायिक झाली आहेत. गणेशोत्सवानिमित्त या चाकरमान्यांसाठी कोकणात गावी जाण्यासाठी जादा गाड्यांची असलेली गरज लक्षात घेता एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत पहिल्या टप्प्यातील जादा बस सेवा एसटीकडून पुरविण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने या वर्षी दोन हजार २०० जादा बस सेवा पुरविण्याची घोषणा केली आहे. या बससेवेसाठी २७ जुलैपासून आगाऊ आरक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वर्षापासून कोकणात जाणाऱ्यांना परतीच्या प्रवासाचे आरक्षणही एकाच वेळी करण्याची सुविधा देण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती देताना राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी येत्या २७ जुलैपासून जादा गाड्यांचं ऑनलाइन आरक्षण करता येणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे रस्त्यात बिघाड होणाऱ्या बसदुरुस्तीसाठी कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी ‘वाहन दुरुस्ती पथक ‘ सज्ज ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरून बस बंद पडून प्रवाशांचे हाल होणार नाहीत अशी माहितीही यावेळी एसटीकडून देण्यात आली. गणेशोत्सवासाठी ग्रुप आरक्षण करण्याला २० जुलैपासून प्रारंभ होणार आहे. एसटी आगारात बुकिंग करण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.