वीज निर्मितीत वाढ झाल्याने राज्य भारनियमनमुक्त - ऊर्जामंत्री 

वीज निर्मितीत वाढ झाल्याने राज्य भारनियमनमुक्त - ऊर्जामंत्री 

मुंबई (प्रतिनिधी) : 
गेल्या पाच वर्षात वीज निर्मितीत मुबलक वाढ झाल्याने राज्य भारनियमन मुक्त झाले असून सर्व भागांमध्ये अखंडित वीजपुरवठा सुरु करणे शक्य झाले आहे. अखंडित वीज पुरवठ्यामुळे कृषी ग्राहकांना चक्राकार पद्धतीने दररोज ८ ते १० तास वीजपुरवठा शक्य झाला आहे. तसेच सौर कृषीपंप देऊन शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी सहाय्य केले जात असल्याची माहिती  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.

२०१४-१५ मध्ये सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे जवळपास ५० मेगावॅट वाढ झाली. यात शिरसुफळ (ता.बारामती, जि.पुणे) येथे ३६.३३ मेगावॅट व १४ मे.वॅट सौरऊर्जा प्रकल्प, २०१४-१५ मध्ये कार्यान्वित झाले. कोराडी, (जि. नागपूर) येथील संच क्र. ८ हा ६६० मे.वॅटचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प डिसेंबर २०१५ ला कार्यान्वित झाला. तर २५७० मे.वॅटचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प २०१६-१७ ला कार्यान्वित झाला. चंद्रपूर, परळी, कोराडी येथील प्रकल्पही कार्यान्वित झाले आणि वीज निर्मिती क्षमतेत ३२८० मे.वॅट वाढ झाली.

महानिर्मितीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना २० मे, २०१९ रोजी घडली. विविध वीज केंद्रातून रेकॉर्ड ब्रेक अशी १००३४ मेगावॅट वीज उत्पादन झाले. यात औष्णिक विद्युत केंद्राचे वीज उत्पादन ७५७७ मेगावॅट, (नाशिक-५६१ मेगावॅट, कोराडी-१५०० मेगावॅट, खापरखेडा-९५१ मेगावॅट, पारस-४५० मेगावॅट, चंद्रपूर-२५५० मेगावॅट, भुसावळ-९६७ मेगावॅट), उरण वायु विद्युत केंद्र २७० मेगावॅट, सौरऊर्जा ११९ मेगावॅट व जल विद्युत केंद्रांपासून २१०० मेगावॅट याचा समावेश आहे.

महापारेषण संदर्भात ६६१ अति उच्च दाब उपकेंद्र निर्माण करुन वीज पारेषित करण्याची क्षमता वाढविली आहे. ४६ हजार पेक्षा जास्त किलोमीटर वाहिन्यांचे जाळे निर्माण करणारी देशातील महापारेषण ही एकमेव कंपनी ठरली आहे. समुद्र तळाखालून साडेसात किलोमीटर लांबीची केबल टाकून घारापूरी बेटावर वीज पुरविण्याचे ऐतिहासिक काम याच कालावधीत करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या दुर्गम आदिवासी उपयोजना क्षेत्रात १३२ के.व्ही. उपकेंद्र, ६० कि.मी.आंतरराज्य वाहिनीची उभारणी करुन त्या परिसरातील १५२ गावातील १२ हजार गावकऱ्यांना सुरळीत व अखंडित वीज पुरविण्यात आल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.