राज्य सरकार विरोधात कल्याण जिल्हा भाजपचे तहसीलदारांना निवेदन 

राज्य सरकार विरोधात कल्याण जिल्हा भाजपचे तहसीलदारांना निवेदन 

कल्याण (प्रतिनिधी) : राज्यात सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का, असा सवाल करीत भाजपने राज्य सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोरोना विषाणूच्या मुक्तीसाठी गेल्या तीन महिन्यापासून राज्य सरकारने कोणतेही ठोस धोरण अवलंबले नसल्याचा आरोप करीत कल्याण जिल्हा भाजपच्या वतीनेही कल्याणच्या तहसीलदारांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आले आहे.

भाजपने आपल्या निवेदनात स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड सुरू आहे, राज्यभरात शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत, राज्यातील गरिबांना रेशनधान्य मिळत नाही, उलट त्यामध्ये घोटाळे सुरू आहेत. यासोबतच राज्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे, सातत्याने रुग्णसंख्या लपविली जात आहे, कोरोनाने बाधित मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचे पालन केले जात नाही अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याचे आरोप केले आहेत. राज्यातील ११ कोटी जनतेच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने कार्यवाही करावी यासाठी भारतीय जनता पार्टी, कल्याण जिल्ह्याच्या वतीने तहसीलदार दीपक आकडे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपा प्रदेश सचिव तथा माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, कल्याण पूर्वचे भाजपा अध्यक्ष संजय मोरे, कल्याण पश्चिमचे अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, मांडा टिटवाळा मंडल अध्यक्ष सुभाष पाटील, परिवहन समितीचे माजी सभापती रमेश कोनकर, रवी सिंग ठाकूर, राजू शेख, सौरभ सिंग आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.