हिंदी न्युज चॅनेल्स पाहणे बंद करा; कल्याणकर तरुणाचे भारतीयांना आवाहन

हिंदी न्युज चॅनेल्स पाहणे बंद करा; कल्याणकर तरुणाचे भारतीयांना आवाहन

कल्याण (प्रतिनिधी) : देश कोरोनाच्या संकटकाळातून जात असताना जनता भीतीच्या छायेत वावरत आहे. त्यांच्या समोर उपासमारीचे, बेरोजगारीसारखे जन्ममरणाचे प्रश्न उभे ठाकले असताना काही हिंदी न्यूज चॅनेल्सनी कोरोनाची फक्त भीतीच कशी वाढेल याच्या बातम्या चालवल्या, जमात प्रकरण तापवले अशा प्रकारचे किळसवाणे प्रकार करणाऱ्या काही हिंदी न्यूज चॅनेल्स नागरिकांनी पाहू नये, असे आवाहन कल्याण पूर्व येथील सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी जनतेला केले आहे.

भोसले यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्व तमाम भारतीयांना एक कळकळीचे आवाहन करताना म्हटले आहे की, जर आपल्याला आपले कुटुंब, आपला समाज व आपला देश वाचवायचा असेल तर आजपासून हिंदी न्युज चॅनेलच्या बातम्या बघायचे की नाही हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. काही हिंदी न्युज चॅनेल तटस्थपणे आपल्या बातम्या प्रसारित करतात, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! पण बहुतांशी चॅनेलवर बातम्यांचे जे किळसवाणे जे प्रकार चालू आहे, ते कुठे तरी आता थांबले पाहिजे. भारतातील नागरिकांनी यासाठी एक जागरूक नागरिक म्हणून काही हिंदी न्युज चॅनेल्सवर पाहण्याचे बंद करून, जनशक्ती काय असते हे मीडियावाल्यांना दाखवून दिले पाहिजे, असे मत विजय भोसले यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे.

हिंदी न्युज चॅनेलवर न पाहण्याची भोसले यांनी पुढील कारणे दिली आहेत-

१) कोरोना संकटकाळात लोक भीतीच्या छायेत असताना लोकांच्या मानसीकतेची कुठल्याही उपाययोजनांच्या बातम्या न देता फक्त बहुतांशी हिंदी चॅनेल्सनी २४ तास ब्रेकिंग न्युजच्या नावाखाली कोरोनाचा धंदा केला. 

२) कोरोनोच्या काळात दोन धर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला, ते म्हणजे मौलाना साद प्रकरण. जमातला कार्यक्रम करायला परवानगी दिली कोणी? या विषयी सरकारला प्रश्न न विचारता, त्यांना धारेवर न धरता, ह्या चॅनेलवाल्यांनी जवळजवळ एक महिना मौलाना साद प्रकरण चालवले. 

कोरोनाच्या काळात सर्व जाती-धर्माचे लोक एकमेकांना मदत करत होते, पण ह्या न्यूज चॅनेलवाल्यांनी जमात प्रकरण वारंवार दाखवून  दोन धर्मातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला व तेढ निर्माण केली.

३) कोरोनाच्या काळात लोंकांच्या जीवनावश्यक  गरजा देखील पूर्ण होत नव्हत्या, लाखो तरुण बेरोजगार झाले, अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. लोक तणावाखाली जीवन जगत असताना सदर चॅनेल पत्रकारितेचे भान विसरून सुशांत राजपूत या अभिनेत्याचे आत्महत्या प्रकरण गेली दोन महिने झाले आहेत २४ तास ते दाखवत आहे. तो कुठे गेला, का गेला, रिया आता कुठे आहे, तिचा बाप व त्याचा बाप आता काय करतो, त्याच्या किती गर्लफ्रेंड होत्या, तो चरस पीत होता का? रियाने त्याला किती लुटले, तो किती दारू प्यायचा, CBIवाले कुठपर्यंत आहे, ED ने काय केले, म्हणजे अक्षरश: सदर चॅनेलवाल्यानी बातम्याच्या कहर केला. २४ तास फक्त ते आत्महत्येचे प्रकरण दाखवत आहेत, जसे काही देशासमोर दुसरे कोणतेच प्रश्न नाहीत ... 

हीच वेळ आहे हिंदी मीडियावाल्याना त्यांची जागा दाखवून देण्याची, जरा विचार करा आणि कृती करा, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.