सुपरस्टार रजनीकांतच्या मराठी सहकाऱ्याने परप्रांतीय मजुरांना वाटल्या आठ हजार चपला 

सुपरस्टार रजनीकांतच्या मराठी सहकाऱ्याने परप्रांतीय मजुरांना वाटल्या आठ हजार चपला 

मुंबई (विठ्ठल जवक) : दक्षिणात्य व हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत मुळचा महाराष्ट्रीयन. लोकांना मदत करण्यातही रजनीकांत नेहेमीच पुढे. याच रजनीकांतचा मराठमोळा सहकारी असलेल्या राज देशमुख यांनी लॉकडाऊनच्या काळात हजारो गरजू कुटुंबांना अन्नधान्याची मदत तर केलीच, त्यातही आपल्या मायदेशी पायी अनवाणी निघालेल्या आठ हजार परप्रांतीय मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांना चपलांचे जोड देत आपल्या माणुसकीला जात-प्रांताच्या भिंती नसल्याचाही प्रत्यय आणून दिला.

राज देशमुख हे मुळचे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील असून सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. ते व्यवसायाने चार्टड अकाऊंटंट आहेत. सुपरस्टार रजनीकांत समवेत काम करताना देशमुख यांना आपल्या मराठीपणाचा फार अभिमान वाटतो. ते शासनाच्या नदीजोड प्रकल्पाचे सल्लागारही आहेत. सध्या कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन कामकाजासह सर्व आर्थिक व्यवहार देखील ठप्प झाल्याने त्याचे दूरगामी परिणाम होत आहेत. विशेषतः गरीब-मजूर-शेतकरी वर्गावर त्याचे सर्वाधिक विपरीत परिणाम होत आहेत. या वर्गाच्या मदतीसाठी सर्व समाज घटकातून दानशूर व्यक्ती-संस्था पुढे येत यथाशक्ती मदत करीत आहेत. राज देशमुख यांनीही गरजूंना मदतीचा हात पुढे केला.

 

देशमुख यांनी सोशल मिडीयावरील आपल्या मित्रांना सोशल मिडीयाद्वारे साद देत जिथे मदतीची गरज आहे तिथे महिनाभराचे अन्नधान्य पुरविण्यासाठी आपल्याला मदत करण्याचे आवाहन मित्रमंडळींना केले. केवळ एकाच भागात नव्हे तर पुणे, अहमदनगर व उस्मानाबाद या जिल्ह्यातील असंख्य गावांमधील हजारो गरजू कुटुंबांपर्यंत WMO, जागृती ग्रुप, वुई पुणेकर्स, राहुल शिंदे मित्र मंडळ आदी संस्था व असंख्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी अन्नधान्य यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. 

अन्नधान्याची गरजूंना मदत करीत असतानाच देशमुख यांना आणखी एक हृदय हेलावणारे चित्र दिसले. येथील हलाखीच्या परिस्थितीमुळे हताश झालेले परप्रांतीय विशेषतः बिहारी कुटुंबे आपल्या मूळ गावी पायी निघाली होती. त्यापैकी अनेकांच्या पायात फाटलेल्या चपला तर काहींकडे तेही नव्हते. त्यांनी तातडीने आठ हजार चपलांची व्यवस्था करीत रस्त्याने पायी जाणाऱ्या गरजू परप्रांतीय मजूर व त्यांच्या कुटुंबियांना गाठून चपलांचे वाटप सुरु केले. मदतीचा हात पुढे करीत माणुसकी जपताना त्याला जात-प्रांत आड येत नसल्याचेच राज देशमुख यांनी आपल्यातील माणुसकीने दाखवून दिले आहे.