सुप्रिया सुळेंनी जिंकली कल्याणकर महिलांची मने !

सुप्रिया सुळेंनी जिंकली कल्याणकर महिलांची मने !

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण पूर्वेतील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश तरे यांच्या प्रचार सभेसाठी सुप्रिया सुळे कल्याणात आल्या होत्या. पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणात झालेल्या प्रचारसभेसाठी उशिरापर्यंत थांबलेल्या महिलांशी भावनिक संवाद साधत त्यांची मने जिंकली. महिलेभोवती फिरणारे तिचे कुटुंब, पाण्याची समस्या या मुद्द्यांविषयी बोलतानाच त्यांनी कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांचा उल्लेख करीत खड्ड्यांविषयीचे सर्वात मोठे आपणच मोबईलवर सुरु केल्याचे आवर्जून सांगितले.

सुप्रिया सुळे आपल्या भाषणात म्हणाल्या की, संसार तुमचा-माझा कुणाचाही सारखाच असतो. महिला दिवसभर काम करतात. सर्व कुटुंब तिच्याभोवती फिरते. मीही गृहिणी आहे. आई ही नेहेमी आई असते. कामावर गेली तरी तिच्या हृदयाचा प्रत्येक ठोका आपल्या मुलांसाठी असतो. पतीची, सासू-सासऱ्याची ती काळजी घेते. महिला ही आयुष्यभर आई असते. तरे यांनी नगरसेवक असताना प्रभागातील पाण्याचा प्रश्न सोडवल्याचा मुद्दा उपस्थित करीत महिलावर्गाला उद्देशून सुळे म्हणाल्या, तुमच्या डोळ्यात दिसणाऱ्या अपेक्षांचे दडपण माझ्यावर येते. महिलेची अपेक्षा एकच असते आपल्या डोक्यावरील हंडा उतरला पाहिजे. त्यांच्या डोक्यावरील हंडा उतरला तर त्या भरघोस मतदान करतील. यावेळी त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांचा उलेख करीत खड्ड्यांमुळे कल्याणला येणे नकोसे वाटते. खड्ड्यांवरील मोठे आंदोलन मी मोबाईलवर सुरु केल्याचे सुळे म्हणाल्या. विकासाची फसवाफसवी जास्त वेळ टिकत नाही. स्थानिक आमदाराला सांगावे लागते विकास झाला नाही. ही खरेच लाजिरवाणी गोष्ट असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. 

यावेळी आमदार जगन्नाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, कल्याणमध्ये अडीच वर्ष राष्ट्रवादीचा महापौर असताना विकास झाला. त्यानंतर एक दिडकी आलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार कोटीं देण्याचे आश्वासन दिले, मात्र साडेसहा दिडक्या दिलेल्या नाहीत. नेवाळी येथील आरक्षित केलेल्या जमिनीचा विषय, रस्ते, पाणी, रुग्णालय, परिवहन  हे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. २५ वर्षांपासून शहरात शिवसेना-भाजपची सत्ता असून देखील दुरावस्था कायम असल्याचे सांगत राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार प्रकाश तरे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. 

यावेळी आमदार जगन्नाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, रमेश हनुमंते, सारिका गायकवाड, विनायक काळण, जे.सी. कटारिया, प्रल्हाद भिलारे, वर्षा कळके, वल्ली राजन, काँग्रेसचे सचिन पोटे आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रचारसभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.