महावितरणकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गातील यंत्रणेची पाहणी

महावितरणकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गातील यंत्रणेची पाहणी

कल्याण (प्रतिनिधी) :
कोकण परिमंडळात महिनाभरापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणची यंत्रणा प्रभावित झाली होती. तरी त्यावेळी ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणने कमीत कमी कालावधीत पूर्ववत केला होता. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असणाऱ्या गणेशोत्सव काळात ग्राहकांना अखंड वीजपुरवठा देण्याच्या दृष्टीने रत्नागिरी व सिंधुदुर्ग मंडळाच्या वीज यंत्रणेची पाहणी कोकण प्रादेशिक विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण कक्षाच्या टीमकडून करण्यात आली.
 

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर तसेच दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी मुख्य अभियंता अंकुश नाळे यांनी संवाद साधला व महावितरणकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या. कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील (भाप्रसे) यांच्या आदेशाने हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. याचबरोबर मुख्य अभियंता अंकुश नाळे यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिमंडळात सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी कोकण परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे,  रत्नागिरी मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रभाकर पेटकर व सिंधुदुर्ग मंडळाचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील हेही उपस्थित होते.

यावेळी मुख्य अभियंता अंकुश नाळे यांनी कोकण परिमंडळा अंतर्गत येणाऱ्या दोडामार्ग, बांदा, चांदुराई व लोटे परशुराम एमआयडीसी  येथील वीज यंत्रणेची पाहणी केली. या प्रकल्पांची पाहणी करताना मुख्य अभियंता अंकुश नाळे यांनी तेथील अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. गणेशोत्सव काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शाखा कार्यालयांना दिलेल्या सर्व साहित्याचीही पाहणी केली. आवश्यक असल्यास अधिकचे साहित्य तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. प्रकल्पांची पाहणी करताना आढळलेल्या त्रुटी निदर्शनास आणून देऊन त्या तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या. दिन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प आदी योजनांच्या अंतर्गत सुरू असणारे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कंत्राटदारांच्या अडचणी समजावून घेत त्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन अंकुश नाळे यांनी यावेळी दिले.