स्वराज्याचा अभेद्य मावळा : किल्ले रायगड

स्वराज्याचा अभेद्य मावळा : किल्ले रायगड
स्वराज्याचा अभेद्य मावळा : किल्ले रायगड

इयत्ता ४ थी च्या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडचीच निवड का केली, याचे कारण देताना म्हटलेय, ‘रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते.’

शिवरायांच्या गनिमी काव्यात सह्याद्री पर्वत रांगातील घनदाट जंगल, डोंगरी किल्ले आणि प्रजेचा पाठींबा याचे अनन्यसाधारण महत्व होते. शिवकालीन ‘आज्ञापत्र’ या ग्रंथामध्ये शिवरायांनी गडांविषयी संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’ असे म्हणत गडकोट-किल्ल्यांचे महत्व सांगितलेले आहे. शिवरायांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधले. शिवरायांकडे जवळपास ३०० किल्ले होते. या ३०० किल्ल्यांमधून स्वराज्याच्या राजधानीसाठी निवडलेला रायगड म्हणजे तर स्वराज्याचा अभेद्य मावळाच! रायगडाची नैसर्गिक अभेद्यता, ताशीव कडे, सह्याद्रीपासून वेगळा झालेला डोंगर इ. कारणांमुळे रायगड भौगोलिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठरतो. युरोपचे लोक रायगडाला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ओळखत. समुद्रतळाहून २७००-२९०० फुट उंच असणारा रायगड शिवरायांच्या पराक्रमाची, दूरदृष्टीची, व्यवस्थापन-स्थापत्य कौशल्याची ग्वाही देतो.

अभेद्य रायगड स्वराज्यात नेमका आला कसा?

शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे काम सुरु केले, तेव्हा त्यांना अनेक मराठा सरदारांनी विरोध केला. ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ या पुस्तकात मा. म. देशमुख लिहितात, ‘मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरेंना शिवाजी महाराजांच्या वाढत्या वैभवाचा हेवा वाटू लागला. त्यांना जावळीच्या अजिंक्यपणाची मोठी घमेंड होती. तो शिवाजीस म्हणे ‘तुम्ही काल राजा झालात, राजे आम्ही. जावळीच्या जवळ याल तर खाक व्हाल. उद्या यायचे ते आजच या.’ म्हणून शिवाजीने जावळीवर हल्ला चढवला. यशवंतराव मोरे शौर्याने लढला. पण, रायरीकडे पळाला. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकले आणि स्वराज्यास जोडले. यशवंतराव रायरीच्या किल्ल्यात शरण आला. पुढे शिवाजी महाराजांनी रायरी जिंकून रायरीच्या किल्ल्यास रायगड हे नाव दिले.’

रायगड रायरी बरोबरच रासिवर, तणस, नंदादीप सारख्या १५ नावांनी ओळखला जायचा. रायरीचा रायगड होण्यापूर्वी निजामशाहीत रायरीचा उपयोग केवळ कैदी ठेवण्यापुरता होई. १६५६ च्या मे महिन्यात रायगड जिंकल्यावर त्याविषयीची नोंद सभासद बखरीने अशाप्रकारे घेतलीय, ‘राजा खाशा जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिडगाव उंच, पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही आणि धोंडा ताशीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका; दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा’

रायगडाचे भौगोलिक स्थान आणि रचनेतील वैशिष्ट्य लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणूनच रायगडाचे बांधकाम हाती घेतले. हिरोजी इंदुलकरांवर स्वराज्याची राजधानी बांधण्याची जबाबदारी सोपवून शिवाजी महाराज पुढील मोहिमेवर निघाले.

हिरोजी इंदुलकरांनी बांधलेला रायगड पाहून आपण आजही आवाक होतो. भक्कम तटबंदी, नानाविध दरवाजे, राजवाडा, राजदरबार, नगार खाना, राणी महाल, धान्य कोठारे, दारू कोठारे, टांकसाळ, अष्टप्रधान वाडे, युवराजांसाठी महाल, गंगासागर तलाव, स्तंभ, शिवमंदिर, शिर्काईदेवी मंदिर, हत्तिशाळा, अश्वशाळा,चोरदरवाजा, बाजारपेठ काय नव्हते रायगडावर? शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड चौफेर नजर ठेवून असायचा.

शिवाजी महाराज १६३०-३६ शिवनेरीवर, १६३६-३९ कर्नाटकात, १६४०-४७ पुण्यात, १६४७-६७ राजगडावर राहिले. पुढच्या काळात म्हणजे १६६८-१६८० शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार रायगडावरूनच पाहिला. स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाने अनेक आनंदाचे क्षण अनुभवले, तसेच कैक दु:खाचे प्रसंगही पचवले. शिवनेरीने शिवबांना तर रायगडाने संभाजींना घडवले. १-२ नव्हे तर रायगडाला ४ राज्याभिषेकांचा साक्षीदार होता आले.

६ जुन १६७४ चा मराठी मातीला, मराठी माणसाला पारतंत्र्यातून मुक्त करणारा, हजारो वर्षानंतर मराठा साम्राज्याचा राज्याभिषेक रायगडाने ‘याची देही याची डोळा अनुभवला’ कित्येक महिने या राज्याभिषेक सोहोळ्याची तयारी सुरु होती. सर्वदूर निमंत्रणे पाठवण्यात आली होती. दूरदुरून आमंत्रित नजराणे घेऊन येऊ लागले. राज्याभिषेकाचा अपूर्व सोहोळाआणि रायगडाची भव्यता पाहून अनेकांचे डोळे दिपले. शहाजी राजेंच्या संकल्पनेतले स्वराज्य, माँसाहेब जिजाऊच्या आशीर्वादाने आणि संस्कारातून उभे राहिलेले स्वराज्य, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, हजारो मावळ्यांच्या सोबतीने निर्माण झालेले स्वराज्य रायगडाच्या साक्षीने, ‘क्षत्रीयकुलवंतस राजाधिराज छ. शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी दुमदुमले. रायगड धन्य झाला- स्वराज्याच्या रयतेवर मायेचे छत्र धरणारा छत्रपती स्वराज्याला मिळाला. पुढे याच रायगडाने छ. शिवाजी महाराजांचा दुसरा तांत्रीक पद्धतीचा राज्याभिषेक, संभाजीराजांचा, राजाराम महाराजांचा राज्याभिषेक अनुभवला.

छ. शिवाजी महाराजांचे कर्तृत्व समजून घ्यायचे असेल, स्वराज्याच्या अधिक जवळ जाऊन प्रशासन व्यवस्था समजून घ्यायची असेल, छ. शिवाजी महाराजांची दुरदृष्टी अनुभवायची असेल तर स्वराज्याची राजधानी रायगडाला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे!

छ. शिवाजी महाराजांची दुरदृष्टी अनुभवायला, लोककल्याणकारी राज्याची राजधानी पाहायला, रयतेच्या राजाच्या राज्याभिषेकाचा पुनर्सोहोळा याची देही याची डोळा अनुभवायला दरवर्षी ६ जुनला किल्ले रायगडावर शिवप्रेमींची गर्दी होते. चला तर तुम्ही येणार ना...?

लेखक : प्रा. गंगाधर सोळुंके