संकल्प प्रतिष्ठानची टिटवाळावासियांना 'स्वर्गरथ' सेवा 

संकल्प प्रतिष्ठानची टिटवाळावासियांना 'स्वर्गरथ' सेवा 

टिटवाळा (प्रतिनिधी) :
एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा स्मशानभूमीपर्यंतचा प्रवास सुविधाजनक व्हावा यासाठी येथील संकल्प प्रतिष्ठानने मांडा-टिटवाळा परिसरातील नागरिकांना स्वर्गरथ सुविधा ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर उपलब्ध करून दिली आहे.

संकल्प प्रतिष्ठानच्या टिटवाळा महोत्सव २०१९ च्या माध्यमातून यावेळी अनंत चतुर्थीच्या निमित्ताने अंत्यसंस्काराकरिता स्मशानभूमीपर्यंत मृत व्यक्तीला नेण्यासाठी स्वर्गरथ सेवा उपलब्ध करून देण्यात आली. मातोश्री लक्ष्मीबाई चंद्रकांत देशेकर स्मरणार्थ सेवा करण्यात आली असून सदर स्वर्गरथाची पुजा कल्याण तालुका पोलिस स्टेशनचे निरिक्षक बालाजी पांढरे यांच्या हस्ते संपन्न झाली. 

या उपक्रमासाठी मोहन मिश्रा यांचे विशेष सहकार्य लाभल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा टिटवाळा महोत्सवचे आयोजक विजय देशेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतान दिली. ही स्वर्गरथाची सुविधा जरी सुरु केली असली तरी त्याची परीसरातील नागरीकांना कमीत कमी गरज लागावी अशी भावना व्यक्त त्यांनी व्यक्त केली. जो जन्माला आला आहे त्याला मरण अटळ आहे. त्यामुळे मरणानंतरचा प्रवास सुखाचा व्हावा या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी पोलीस उपनिरिक्षक राजपूत, शिवसेना विभागप्रमुख दादा खिसमतराव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष भोईर, संकल्प प्रतिष्ठानचे आधारस्तंभ संतोष देशेकर, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सुभाष जोशी आदींसह शहरातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.