कल्याणच्या कचरा डेपोतील दुर्गंधी कमी करण्यासाठी तातडीने उपाय करा

कल्याणच्या कचरा डेपोतील दुर्गंधी कमी करण्यासाठी तातडीने उपाय करा

मुंबई (प्रतिनिधी) : 
आधारवाडी येथील कचरा डेपोमुळे दुर्गंधी व घाणीचा त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. त्यासाठी यंत्रणा उभी करावी, अशी सक्त सूचना देत, या डेपोला पर्यायी बारावे व उंबर्डे येथील कचरा डेपो लवकरात लवकर सुरू करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.

आधारवाडी कचरा डेपोच्या समस्यांसंदर्भात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, आमदार नरेंद्र पवार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांच्यासह आधारवाडी परिसरातील विविध स्वयंसेवी संघटना व नागरिक यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, आधारवाडी कचरा डेपो बंद करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करावा. त्यासाठी उंबर्डे व बारावे येथील कचरा डेपो सुरू करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. तसेच डेपोमध्ये कमीत कमी कचरा जावा, यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभी करावी.