२७ गावांची पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यास दोन वर्ष लागणार

२७ गावांची पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यास दोन वर्ष लागणार

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील २७ गावांसाठीची सुमारे १९४ कोटींची योजना येत्या दोन वर्षात पूर्ण केली जाईल, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केला आहे. 

सदर योजनेसाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आला असून त्यासाठी कार्यादेश देखील देण्यात आल्याचे पाठक यांनी सांगितले. या प्रकल्पांतर्गत २७ जलकुंभ व १२ संप हाऊस (खालील टाक्या) बांधण्यात येणार आहेत. याशिवाय मुख्य जलवाहिन्या तसेच वितरण वाहिन्याही टाकण्यात येणार आहेत. 

महापालिका हद्दीतील २७ गावांना महापालिका, एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथील लोकवस्ती वेगाने वाढू लागली आहे. तसेच काही काळापासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होऊ लागले आहेत. अनेकदा त्यावरून या ग्रामीण भागातील नगरसेवकांना नागरिकांच्या भडक्याला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे २७ गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याचा प्रस्ताव पुढे आला. २७ गावांसाठीची ही पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्यास लागणारा कालावधी पाहता येथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळण्यास आणखी दोन वर्षे वाट पहावी लहाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.