ठाणे शहराच्या हवामानाची सद्यस्थिती मोबाईलवर

ठाणे शहराच्या हवामानाची सद्यस्थिती मोबाईलवर

ठाणे (प्रतिनिधी) : 
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हवेचे नियमित सर्व्हेक्षण करण्याकरिता अद्ययावत वेदर स्टेशन यंत्रणा २४ तास कार्यरत असून हवामानाची सद्यस्थिती, पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, हवेचा वेग आदींची माहिती नागरिकांना मोबाईल अॅप, संकेतस्थळावर उपलब्ध करून  देण्यात आली आहे. शहरातील  ठामपा मुख्यालय, ट्राफीक पार्क-कावरसेर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, विटावा, मुंब्रा अग्निशमन केंद्र तसेच दिवा प्रभाग समिती या ६ ठिकाणी  वेदर स्टेशन उभारण्यात आली आहेत. या सर्व स्टेशन्सवर संकलित होणारी माहिती एकत्रित करुन ती मोबाईल अॅप तसेच ठामपाच्या संकेतस्थळावरुन नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

हवामानाची सर्व माहिती उपलब्ध होण्याकरिता  नागरिकांनी  गुगल प्ले स्टोअरवर Pollution Control Cell app असे टाईप करुन अॅप्लिकेशन  डाऊनलोड करावे.. या अॅप्लिकेशनद्वारे नागरिकांना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हवेच्या गुणवत्तेची सद्यस्थिती, हवामानाची सद्यस्थिती, पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, हवेचा वेग तसेच  प्रदूषण नियंत्रणाकरिता आपण अवलंबावयाची कार्यपद्धती याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आली.

तसेच नागरिकांना ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर देखील हवामान सद्यस्थितीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे http://pcctmc.com/weather या संकेतस्थळावर हवामानाची सद्यस्थिती, ठाणे खाडीच्या भरती-ओहोटीची माहिती उपलब्ध असून पर्जन्यमानाची माहिती आलेखस्वरुपात उपलब्ध आहे. ठाणेकर नागरिकांनी हवेची गुणवत्ता व हवामान सद्यस्थितीची माहिती मोबाईल अॅप्लिकेशन तसेच ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावी, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.