कोरोना व्हायरसबाबत ठाणे महानगरपालिकेच्या विविध सुविधा

कोरोना व्हायरसबाबत ठाणे महानगरपालिकेच्या विविध सुविधा

ठाणे (प्रतिनिधी): 
कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करतानाच या व्हायरसचा सामना करण्यासाठी ठाण्यामध्ये श्रीनगर येथे २५ खाटांची तसेच रोझा गार्डनिया येथे १५ खाटांची विलगीकरण सुविधा निर्माण करण्यात आली आहे.  तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे ८ खाटांची विलगीकरण आणि खाजगी रुग्णालयांमध्ये १२ खाटांची विलगीकरण सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

दरम्यान याबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने मोठया प्रमाणात कार्यवाही करण्यात येत असून कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये नुकतेच महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आणि महापालिका आयुक्त (प्रभारी) राजेंद्र अहिवर यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी, वैद्यकिय अधिकारी यांची बैठक संपन्न होऊन त्यामध्ये कोरोनाबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे महापालिकेच्यावतीने रॅपिड रिस्पॉन्स पथक गठीत केले असून आपत्ती व्यवस्थापन कक्षात २४ तास एका डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेच्या पुढाकाराने ज्युपिटर हॉस्पिटल येथे २, काळसेकर हॉस्पिटल, मुंब्रा येथे २, वेदांत रुग्णालय येथे ५, कौशल्य हॉस्पिटल येथे २ आणि बेथनी रुग्णालय येथे २ खाटांची विलगीकरण सुविधा निर्माण करण्यात आली आहे. कोरोनाबाबत नागरिकांनी घाबरून न जाता जागरुक राहून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त (प्रभारी) राजेंद्र अहिवर यांनी केले आहे.