ठाणे महापालिकेची ‘राष्ट्रीय जंतनाशक मोहिम’

ठाणे महापालिकेची ‘राष्ट्रीय जंतनाशक मोहिम’

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक २१ सप्टेंबर, २०२१ ते २८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ‘‘राष्ट्रीय जंतनाशक मोहिम’’ राबविण्यात येणार असुन बालकांचे आरोग्य, त्यांची पोषणविषयक स्थिती व जीवनाचा दर्जा सुधारावा यासाठी ०१ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळयांचे वाटप करण्यात येणार आहे.

सदर मोहिमेमध्ये सर्व शासकीय अनुदानित शाळा, महापालिका व खासगी अनुदानित शाळा तसेच या वयोगटातील शाळेत न जाणा-या बालकांमध्ये जंतनाशकाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जंताचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने अस्वच्छता व दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे राऊंड वर्म, व्हिप वर्म व हुक वर्म हया प्रकारातील जंतांचा  प्रसार मोठया प्रमाणावर होतो. जंताचा प्रादुर्भाव झालेल्या मुलांमध्ये कुपोषण व रक्तशय होऊन त्यांना कायम थकवा जाणवतो. परिणामी त्यांची शारीरीक वाढ व मानसिक विकास पुर्णतः होत नाही. म्हणून ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ही जंतनाशक मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे.

सदर मोहिमेमध्ये ०१ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुलामुलींना अल्बेंडाझोल ही एक गोळी देण्यात येणार आहे. ०१ ते ०६ वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना अंगणवाडीतून तर, ०६ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना जंतनाशकाची गोळी सर्व  शासकीय अनुदानित शाळा, खाजगी अनुदानित शाळा, आश्रम शाळा तसेच महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये देण्यात येणार आहे. जंतांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी उघडयावर शौचास बसू नये, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छ पाण्याने फळे, भाज्या धुवाव्यात व मगच खाव्यात.नेहमी स्वच्छ पाणी प्यावे, खाण्याचे  पदार्थ झाकून ठेवावेत, नखे  स्वच्छ ठेवून नियमित कापावीत. पायात बुट, चप्पल नेहमी घालावे, जेवणाआधी  व शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत आदी उपाय अंमलात आणावेत असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात  आले आहे.

या मोहिमेमध्ये नागरिकांनी आपल्या घरातील ०१ ते १९ वर्षातील सर्व लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी अवश्य देण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. या जंतनाशक मोहिमेमध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण विभाग, नागरी विकास, महिला व बालविकास विभाग, पंचायत राज मंत्रालय आदी विभागांचा यामध्ये समावेश आहे.