तिवरे धरण पोखरणारे खेकडे पोलिसांच्या ताब्यात देत राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

तिवरे धरण पोखरणारे खेकडे पोलिसांच्या ताब्यात देत राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

ठाणे (प्रतिनिधी)- 
खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटल्याचा दावा करणाऱ्या जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विधानाचा समाचार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी धरण पोखरणारे खेकडे ठाणे पोलिसांच्या ताब्यात देत त्यांना अटक करण्याची मागणी करीत राज्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाचा समाचार घेत अनोख्या पद्धतीने निषेध केला. सरकारच्या दाव्यांकडे पाहता ‘हे’ सरकार बेशरम असल्याचे सिद्ध होत असल्याची बोचरी टीकाही आ. आव्हाड यांनी यावेळी केली.

खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटल्याची माहिती स्थानिकांनी दिल्याचा दावा जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी नुकताच केला होता. त्यावेळी या घटनेला चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण जबाबदार नसल्याचे सांगत सावंत यांनी चव्हाणांची पाठराखण केली होती. सावंत यांच्या ‘त्या’ विधानाबद्दल राज्यभर संताप व्यक्त होत आहे. आ. आव्हाड, शहराध्यक्ष परांजपे यांनीही राज्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाचा ठाणे येथे पोलिसांना खेकडे देत अनोख्या पद्धतीने निषेध केला.

आव्हाड आणि परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळच्या सुमारास नौपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त तडवी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांना खेकडे देत जलसंधारण राज्यमंत्र्यांनी सांगितलेले ‘हेच ते खेकडे’ असल्याचे सांगत यांनीच धरण फोडले आहे. या खेकड्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना जेलमध्ये टाका, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली.

यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तिवरे दुर्घटनेत २३ जण वाहून गेले, अद्याप १० जण भेटलेले नाहीत. तरीही धरण फुटण्यात आमचा काही दोष नाही; हे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचे सांगून जलसंधारण राज्यमंत्री मोकळे झाले. यावर काय बोलायचे? आमदाराचा भाऊ तिथे कंत्राटदार म्हणून काम करतोय. त्याला अटक करायची नसेल तर नका करु पण, या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना यातना होतील असे तरी बोलू नका. या गावातील लोकांनी आम्हाला सांगितले की, धरणाला भेगा पडल्याच्या तक्रारी आम्ही दोन वर्षांपासून करत आहोत. पण, कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीत. एखादा मंत्री सरळ सांगतो की खेकड्यांनी धरण फोडले. याला फक्त बेशरम एवढाच शब्द लागू होतो, अशी टीका आव्हाड यांनी केली. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाता घाग, ज्येष्ठ नागरीक सेलचे  रामदास खोसे, सिल्वेस्टर डिसोजा, हेमंत वाणी, विक्रांत घाग, रवींद्र पालव, निलेश कदम, प्रफुल कांबळे, सुमित गुप्ता, रवींद्र साळुंखे, फिरोज पठाण, दीपक पाटील, ज्योति निंबरगी, मेहेरबानो पटेल, स्मिता पारकर, वंदना हुंडारे, शुभांगी कोलतकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.