मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये ठाण्याला पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व !

मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये ठाण्याला पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व !

ठाणे (प्रतिनिधी) :
'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या निवडणुकीत मॅनेजिंग कमिटी मेम्बर म्हणून ठाण्यातील माजी नगरसेवक विहंग प्रताप सरनाईक यांची शुक्रवारी निवड झाली आहे. १६५ मते मिळवून सरनाईक हे विजयी झाल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला-शहराला प्रतिनिधीत्व मिळाले आहे.

विहंग सरनाईक यांना निवडणुकीत १६५ मते मिळाली आहेत.  मुंबई ठाण्यातील ३५० क्लब व ३९ दिग्गज क्रिकेटपटू यांनी मतदान केले. विहंग सरनाईक यांना विक्रमी असे मतदान झाले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे काम यापुढे ठाण्यात ठळकपणे करणार आहोत. आज ठाणे व आसपासच्या परिसरातील मुलांना क्रिकेटची प्रॅक्टिस करण्यासाठी ट्रेनने मुंबईला जावे लागते. सामानाची जड बॅग घेऊन प्रवास करताना होणारा त्रास आणि वेळेचा अपव्यय यावर उपाय म्हणून ठाण्यातच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास आपण प्राधान्य देणे, ठाण्यात व आसपासच्या शहरातील क्रिकेटप्रेमींसाठी पोषक वातावरण तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय पातळीवर उंच उडी व लांब उडी मधील खेळाडू म्हणून ओळख असलेल्या विहंग सरनाईक याना खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोयीसुविधाची चांगली माहिती आहे. खेळाडूंमध्ये ते सतत वावरत असतात. त्यामुळे शहरातील खेळाडूना काय सोयी हव्यात याची जाणीव आहे. ठाण्यात मैदाने आणि त्यावर विकेट, चांगले प्रशिक्षक, मैदाने, चांगले टॉयलेट इत्यादी सुविधांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करू. क्रिकेट खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी एक क्रिकेट प्रशिक्षण अकॅडमी तयार करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.