ठाण्यातील झोपडपट्टीधारकांना मुंबई प्रमाणेच मिळणार ३०० चौ.फु. घर

ठाण्यातील झोपडपट्टीधारकांना मुंबई प्रमाणेच मिळणार ३०० चौ.फु. घर

ठाणे (प्रतिनिधी) :
झोपडपट्टी पूनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) मुंबईप्रमाणेच ठाण्यातील झोपडपट्टीधारकांनाही ३०० चौरस फुटाचे घर देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. आ. संजय केळकर यांनी या विषयावर विधीमंडळात चर्चा घडवून आणली होती. त्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन पाठपुरावा सुरु ठेवला. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केल्याने ठाणे शहरातील हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत २०११ च्या जनगणनेनुसार विविध प्रकारच्या जमिनीवर २१० झोपडपट्ट्या वसलेल्या असून त्यांची लोकसंख्या साडेनऊ लाखांच्या आसपास आहे. झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर मिळून त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी एसआरए योजना अस्तित्वात आली. या योजनेंतर्गत झोपडपट्टीधारकांना २६९ चौरस फुटाचे घर देण्यात येत होते. मात्र २०१८ मध्ये मुंबईतील झोपडीधारकांना ३०० चौरस फुटाचे घर देण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाण्यातील झोपडपट्टीधारकांना २६९ चौरस फुटाचेच घर देण्यात येत असल्याने दुजाभाव केला जात असल्याची भावना शहरातील झोपडपट्टीधारकांमध्ये होती. ठाणे मतदारसंघाचे आ. केळकर यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित केला.
या योजनेंतर्गत मुंबईत चार तर ठाण्यात तीन एफएसआय देण्यात येतो. शिवाय मुंबई आणि ठाण्यातील जमिनींच्या किमतीमध्येही फरक आहे. त्याचा लाभ मुंबईतील विकासकांना जास्त मिळतो. योजना राबवताना मुंबईत ५१ टक्के झोपडपट्टीधारकांची संमती आवश्यक ठेवली आहे, ठाण्यासाठी मात्र ७० टक्के संमती ठेवण्यात आली आहे.

आ. संजय केळकर यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ठाणेकर झोपडपट्टीवासींची बाजू मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईप्रमाणेच ठाण्यातील झोपडीधारकांना ३०० चौरस फुटाचे घर देण्याची मागणी मान्य केली. अन्य अटीनियमही मुंबईप्रमाणेच ठेवण्यात येतील. आगामी नवीन विकास आराखड्यात (डीसीआर) याचा अंतर्भाव करण्यात येईल, असे फडणवीस यांनी केळकर यांना सांगितले. यावेळी केळकर यांनी तातडीने अधिसूचना काढण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली. आ.केळकर यांच्या प्रयत्नांना यश आल्याने ठाण्यातील झोपडपट्ट्यांमधील हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.