ठाणे स्मार्ट सिटीतर्फे शाश्वत विकास ध्येयावर आधारित कार्यशाळा संपन्न

ठाणे स्मार्ट सिटीतर्फे शाश्वत विकास ध्येयावर आधारित कार्यशाळा संपन्न

ठाणे (प्रतिनिधी) : 
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शाश्वत विकास ध्येये प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या सहभागाला प्राधान्य देवून कोणते नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जावेत याचा अभ्यास करण्यासाठी ठाणे स्मार्ट सिटीच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुधवारी महापालिका भवन येथे करण्यात आले. शाश्वत विकासाच्यादृष्टीने अधिकारी-कर्मचारी यांचेकडून विविध संकल्पना यावेळी जाणून घेण्यात आल्या.

शाश्वत विकासाचा एक भाग म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य, गरिबी, रोजगार, शिक्षण, पर्यावरण, खाडी किनारा संवर्धन या सर्वच क्षेत्रात ठाणे स्मार्ट सिटीने कोणते उपक्रम राबवून नागरिकांचा सहभाग वाढविला आहे याची संपूर्ण  माहिती स्मार्ट सिटी लिमीटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्तसमीर उन्हाळे यांनी यावेळी दिली.

दारिद्रय निर्मुलन, भूक निर्मुलन, चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, शुद्ध पाणी आणि स्वच्छता, नूतनीकरण करण्याजोगी आणि स्वस्त ऊर्जा, चांगल्या नोकर्‍या आणि अर्थशास्त्र, नवीन उपक्रम आणि पायाभूत सुविधा, असमानता कमी करणे, शाश्वत शहरे आणि समाज, उपलब्ध साधनांचा जबाबदारीपूर्वक वापर, हवामानाचा परिणाम, शाश्वत महासागर, जमिनीचा शाश्वत उपयोग, शांतता आणि न्याय, शाश्वत विकासासाठी भागिदारी ही १७ ध्येये युनायटेड नेशन्सने बनवली आहेत. या ध्येयाचा विचार करता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कोणते उपक्रम राबविण्यात येतील याचा अभ्यास करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यशाळेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते गृहनिर्माण सहकारी सोसायटीपर्यंत समाजातील सर्व घटकांना शाश्वत विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करून पायाभूत विकासाबरोबरच आनंदी शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी यासाठी कोणते प्रकल्प राबविले जावेत याबाबत या कार्यशाळेत माहिती देण्यात आली. गरिबी, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण तसेच रोजगार आदी बाबत कोणत्या गोष्टीवर जाणीवपूर्वक काम करून विविध उपक्रम राबविले जावेत याची माहिती ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडियाचे संचालक शंकर  जाधव यांनी यावेळी दिली. त्यांच्यासोबत संस्थेच्या संचालिका रेणुका जाधव, प्रशिक्षक भीमराव तुपे, कार्यक्रम व्यवस्थापक सोमनाथ सिंग आदी या कार्यशाळेस उपस्थित होते. या कार्यशाळेत महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.