आशियातील सर्वात लहान शास्त्रज्ञ ‘ठाणेकर’ अक्षत मोहितेंवर कौतुकाचा वर्षाव

आशियातील सर्वात लहान शास्त्रज्ञ ‘ठाणेकर’ अक्षत मोहितेंवर कौतुकाचा वर्षाव

ठाणे (प्रतिनिधी) : 
आशिया खंडातील सर्वात लहान शास्त्रज्ञ ठरलेल्या व सध्या नासामध्ये काम करीत असलेल्या ‘ठाणेकर’ अक्षत मोहिते यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची सदिच्छा भेट घेतली. नासामध्ये संशोधन करीत असलेला हा शास्त्रज्ञ ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे, असे कौतुकाद्गार जयस्वाल यांनी काढले. देशाचा नावलौकिक वाढविणाऱ्या अक्षत यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

ठाण्यातील अक्षत मोहिते हे सर्वात लहान शास्त्रज्ञ नासामध्ये कार्यरत आहेत ही ठाणेकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब असल्याचे उद्गार आयुक्त जयस्वाल यांनी यावेळी काढले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आयुक्तांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक, संदीप डोंगरे आदी उपस्थित होते. सध्या ठाणे येथे आलेल्या अक्षत मोहिते यांच्यावर ठाणेकरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दुसरीपासूनच शास्त्रज्ञ व्हायचे असे, स्वप्न बाळगणारे अक्षत मोहिते आज नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहे. ठाण्यातील आर्या केंब्रिज स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले असून आठवीपासून त्यांनी अनेक शास्त्रज्ञांची पुस्तके वाचावयास सुरूवात केली. वयाच्या १६ व्या वर्षी अक्षत यांनी २० हजार लोक एका वेळी राहू शकतील या विषयावर ’स्पेस सेटलमेंट’ हा रिसर्च पेपर तयार केला व हा पेपर नासा एम्स रिसर्च येथे पाठविण्यात आला. त्याच्या या पेपरचे सादरीकरण इंटरनॉशनल स्पेस डेव्हलपमेंट कॉन्फरन्स येथे शास्त्रज्ञांसमोर झाले व ते निवडले गेल्याची माहिती अक्षत यांनी यावेळी बोलताना दिली.

सन २०३२ मध्ये मंगळ ग्रहावर लोकांना पाठविण्यात येणार असून त्यासाठी होत असलेल्या संशोधनामध्ये अक्षतची निवड करण्यात आली आहे. या संशोधनामध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे. सध्या आपण या संशोधनामध्ये व्यस्त असल्याचे ते यावेळी म्हणाले. नासाबद्दल देशातील मुलांना माहिती व्हावी व तरूणांना देखील या क्षेत्राबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी अक्षत यांनी डिसेंबरमध्ये ठाण्यात एका सेमिनारचे आयोजन केल्याची माहिती याप्रसंगी दिली. या सेमिनारमध्ये नासाचे शास्त्रज्ञ डॉ. रवि मार्गश्यम् व स्वतः अक्षत देखील मार्गदर्शन करणार आहेत.