ठाण्याचा हॅप्पी व्हॅली रोड होणार 'हिरवागार'

ठाण्याचा हॅप्पी व्हॅली रोड होणार 'हिरवागार'

ठाणे (प्रतिनिधी) :

आंब्यांच्या कोयी, विविध फळांच्या बिया, गॅलरीतील कुंडीत वाढलेल्या मोठमोठ्या रोपांसह औषधी व बहुपयोगी झाडे मानपाडा येथील हॅप्पी व्हॅली ते नीलकंठ ग्रीन रोडच्या दुतर्फा स्थानिक गृहसंकुलातील रहिवाशांसह अमोल जामदार फाउंडेशनच्या वतीने रविवारचा सुट्टीचा मुहूर्त साधून लावण्यात आली. या कार्यक्रमाला ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थिती नोंदवत स्थानिकांच्या या उपक्रमाला बळ दिले. यंदाच्या पावसाळ्यात या नव्या रोपट्यांनी बाळसं धरताच हॅप्पी व्हॅली ते नीलकंठ 'ग्रीन' रोड नावाप्रमाणेच हिरवागार होणार आहे. 

मानपाडा येथील टिकुजीनीवाडी परिसरात नवनवीन गृहसंकुले उभी राहत असताना काही वर्षांपूर्वी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र हॅप्पी व्हॅली ते नीलकंठ ग्रीन रोड दोन्ही बाजूला पुरेशी मोकळी जागा असल्याने हा परिसर हिरवागार करण्याचा निर्धार मानपाडावासियांसह अमोल जामदार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या अंकिता जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात आज वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले. आंबा, पेरू, कडुनिंब, बहावा अशा झाडांचे हॅप्पी व्हॅली, शुभारंभ, सहयोग गृहनिर्माण संस्था, शिगवण प्रतिष्ठान, नव संकल्प प्रतिष्ठान या गृहसंकुलाचे सदस्य व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी रोपण केले.

यावेळी ठाणे शहर शिवसेना सहकार विभागाचे संपर्क प्रमुख अमोल जामदार, फाउंडेशनचे सचिव अक्षय जामदार, ठाणे शहर भाजप अध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक मुकेश मोकाशी, चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे, महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाच्या महिला प्रमुख रिदा रशीद, शिवसेना शाखाप्रमुख प्रल्हाद बोरसे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मयुरेश जोशी, ठाणे शहर सरचिटणीस सारंग मेढेकर, मनसेचे शाखाध्यक्ष संतोष निकम आदी मान्यवर उपस्थित होते.