खाडी लगतच्या झोपटपट्टीतील ३५ कुटुंबांच्या दुर्दशेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

खाडी लगतच्या झोपटपट्टीतील ३५ कुटुंबांच्या दुर्दशेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

कल्याण (प्रतिनिधी) : 
कल्याणच्या खाडी किनारी असलेल्या गणेश घाट झोपडपट्टीची चार दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे दैना उडाली आहे. येथील सर्व झोपड्या उध्वस्त झाल्या असून त्यात राहणाऱ्या कुटुंबांनी जवळच्या मंदिरात, तसेच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आश्रय घेतला आहे. चार दिवस उलटूनही कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने या कुटुंबांची दखलच घेतलेली नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेचा आपत्कालीन विभागाच्या येथील कुटुंबांची दुर्दशा गावीही नसल्याचे चित्र दिसून आले.

चार दिवसांनी पावसाचे पाणी ओसरल्यावर या गणेश घाट झोपडपट्टीतील लोक आपल्या उध्वस्त झालेल्या झोपड्याकडे परतले आहेत. त्यांच्या घरातील वस्तू, अंथरून-पांघरून, तसेच अन्नपदार्थव इतर सामानसुमान पावसाच्या पाण्याने उद्धस्त  झाले. शाळेत शिकणाऱ्या मुलांची दप्तरे, पुस्तके देखील शिल्लक राहिली नाहीत. या गणेशघाट झोपडपट्टीत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलात आपले संसार कसे उभे करायचे असा प्रश्न येथील झोपडपट्टीवासीयांना पडला आहे.

गणेशघाट झोपडपट्टीतील या दुर्दाशेसंदर्भात तहसीलदार दीपक आकडे यांना काही नागरिकांनी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी आपण मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे येथील स्थानिक नगरसेवक वरून पाटील यांनाही फोन केला असता त्यांनी मी उद्या बघतो असे सांगितले. सदर झोपडपट्टीवासीयांच्या दुर्दशेकडे सर्वांचेच दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. घरदार उध्वस्त झालेल्या गणेश घाट झोपडपट्टीत काही सामाजिक कार्यकर्ते आपल्या तुटपुंजी मदत करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. दर वर्षी येथे ही परिस्थिती उदभवत असल्याने शासनाने अथवा महापालिकेने आमचे पुनर्वसन करावे, अशी येथील कुटुंबियांची मागणी आहे.