टिटवाळ्यातील पाटील कुटुंबाने साकारलेल्या खंडेरायाच्या जेजुरीने वेधले भाविकांचे लक्ष 

टिटवाळ्यातील पाटील कुटुंबाने साकारलेल्या खंडेरायाच्या जेजुरीने वेधले भाविकांचे लक्ष 

टिटवाळा (प्रतिनिधी) : 
अष्टविनायकापैकी एक असलेल्या महागणपतीच्या श्रीक्षेत्र टिटवाळा येथेही यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच घरगुती गणेशोत्सवाची परंपरा बहुसंख्य घरांमध्ये पाळली जाते. येथील गणेशभक्त रत्नाकर धर्मा पाटील यांच्या घरी देखील गेल्या २२ वर्षांपासून अखंडपणे घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्त पाटील यांच्या घरी उभारण्यात येणारे भव्य व आगळेवेगळे देखावे हा टिटवाळ्यासह परिसरात चर्चेचा विषय ठरतो. यंदाही त्यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीखंडेरायाचे जेजुरी येथील भव्य मंदिर साकारत भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ठाणे जिल्हा कल्याण तालुक्यातील मांडा-टिटवाळा गावचे गणेशभक्त रत्नाकर धर्मा पाटील गेल्या २२ वर्षांपासून आपल्या घरगुती गणेशोत्सवात नवनवीन देखावे साजरे करून परिसरातील गणेशभक्त बाळ गोपाळ यांना मुंबई-पुण्यातील अनोखे देखावे पाहण्यासाठी जाणे होत नाही म्हणून आपल्या परिसरातच गणेश भक्तांना आपल्या घरगुती गणेशोत्सवात प्रत्येक वर्षी नवनवीन देखावे तयार करतात. एक महिन्यापासून पूर्वतयारी करून अत्यंत सुबक आणि सुंदर असा देखावा पाटील कुटुंब दरवर्षी सादर करतात. या वर्षी त्यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा श्रीखंडेरायाचे जेजुरी प्रमाणेच अनोखे मंदिर स्वरूपातील देखावा तयार केला आहे. हा भव्य देखावा पाहण्यासाठी मांडा-टिटवाळा परिसरातील भाविक गणरायांचे दर्शन घेण्यासाठी तसेच हा देखावा पाहण्यासाठी आवर्जून भेटी देत आहेत.

सदरच्या देखाव्यांच्या मुख्य दरवाजावर सुंदर असे तुळशी वृंदावन आहे. गुहेप्रमाणे असलेल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच जेजुरी पर्वतगड साकारलेले दिसते. त्यावर शिवलिंग आकार ‘मृत्यूलोक दुसरे कैलास शिखर’ ‘येलकोट येलकोट जय मल्हार’ असा संदेश लिहिलेला आढळतो. तेथेच महाकाय त्रिशूळ डमरू असून त्यावरील सुंदर अक्षरात रेखाटलेली अडीच फुटाची मनमोहक "श्रीगणेशाची" सुंदर मूर्ती आपले लक्ष केंद्रित करते. त्या पाठीमागे महाकाय श्री विष्णूचे वाहन, खंडेरायाची जेजुरी दिसते.  तेथील मुख्य प्रांगणात अतिशय उंच अशी १५४ दिव्यांचा दीपस्तंभ आहे. त्या बाजूलाच श्री म्हाळसा देवी, मधोमध श्री काळभैरव आणि श्री बाणाई देवी दृष्टीस पडतात. उंच पर्वतावर ब्रह्मा विष्णू आणि महेश विराजमान असून महादेवाच्या मस्तकावर सुंदर चंद्रकोर आणि गंगा दिसते. अशा मंगलमय वातावरणात गणेशदर्शन घेतल्यानंतर भाविकांना आणखी काही काळ तेथेच थांबावेसे वाटते.  

समोरच्या डोंगरावर जेजुरीचा राजा साक्षात श्री मल्हारी मार्तंड महाकाय तलवारी सोबत सिंहासनावर विराजमान असलेला दिसतो. त्यामुळे साक्षात जेजुरीला आल्याचा भास होतो. या मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेऊन भक्तजन ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करीत गुहेतून बाहेर पडतात. असा हा अनोखा देखावा पाहण्यासाठी आणि बुधवार, दि. ११ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी निमित्त आयोजित श्री सत्यनारायण महापूजेच्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी जरूर यावे असे आवाहन रत्नाकर धर्मा पाटील आणि कुटुंबीयांनी केले आहे.