लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून प्रारंभ

लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून प्रारंभ

कल्याण (प्रतिनिधी) : लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरवात होत आहे. १४  ऑगस्ट रोजी कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती या समितीचे स्वागताध्यक्ष तथा कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली.

या वेळी ज्येष्ठ कवी प्रा. प्रशांत मोरे, साहित्यिक गिरीष लटके, ज्येष्ठ नाटय़ अभिनेते आणि कवी सुधीर चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमास वामनदादा कर्डक यांच्या गावचे सरपंच दत्ताराम डोमाडे यांच्यासह जे. जे. आर्ट स्कूलचे गणेश तरतरे,  कायद्याने वागा चळवळीचे प्रमुख राज असरोंडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटना निमित्त कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

ह्या लोककवीला मानवंदना म्हणून पुल कट्टा, कल्याणने त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा मानस केला आहे. यास्तव कल्याण नगरीतील समविचारी सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते यांनी एकत्रित येत जन्मशताब्दी महोत्सव समिती स्थापन केली आहे. कवी-कथाकार किरण येले यांची जन्मशताब्दी समिती अध्यक्षपदी आणि प्रा. प्रशांत मोरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्षपदी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांची निवड करण्यात आली आहे.

वामनदादा याचे साहित्य आणि कार्य जनसामान्य आणि नव्या पिढी पर्यंत पोहोचवणे या उद्देशाने समितीने वर्षभर जन सहभाग केंद्रस्थानी ठेवून काही अभिनव संकल्प केले आहेत. करोना काळात सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करीत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने हे कार्यक्रम केले जाणार आहेत.

जन्मशताब्दी निमित्ताने उदघाटन व समारोप समारंभ होणार असून  जलसा, शॉर्टफिल्म, वामनदादा कर्डक यांच्या गीतांचे गायन स्पर्धा, वक्तृत्व, चित्रकला, कॅलिग्राफी, एकांकिका, आठवणी संकलन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक संस्था, कार्यकर्ते यांच्या सहकार्याने दिंडी वामनदादाच्या जन्म गावांतून डिसेंबर २०२१ मध्ये निघेल व जानेवारी २०२२ मध्ये कल्याण येथे सांगता होईल. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, जळगाव, अमरावती, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.