नव्या दुर्गाडी पुलाच्या मार्गिकेचे मुख्यमंत्र्यांचा हस्ते सोमवारी ‘ऑनलाईन’ लोकार्पण

नव्या दुर्गाडी पुलाच्या मार्गिकेचे मुख्यमंत्र्यांचा हस्ते सोमवारी ‘ऑनलाईन’ लोकार्पण

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या नवीन  दुर्गाडी पुलाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. येत्या ३१ मे रोजी सायंकाळी ५  वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे या मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे.

आमदार विश्वनाथ भोईर यांनी शुक्रवारी नवीन दुर्गाडी पुलाला भेट देऊन त्याच्या बांधकामाचा आढावा घेऊन उपस्थित  अधिकारीवर्गाला काही सूचनाही केल्या. यावेळी त्यांच्यासोबत एमएमआरडीएचे अधिकारी, वाहतूक पोलिस अधिकारी आदी उपस्थित होते. ३१  मे रोजी सांयकाळी ५ वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे हे ऑनलाइन प्रणालीद्वारे मार्गिकेचे उदघाटन करतील तर पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शहरातील लोकप्रतिनिधी नवीन दुर्गाडी पुलाच्या ठिकाणी याप्रसंगी उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार भोईर यांनी यावेळी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक याची वाट बघत होते. मी स्वतः याचा वारंवार पाठपुरावा करीतच होतो तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेही सातत्याने येथील कामावर लक्ष होते. आता मात्र नवीन पुलाच्या एका मार्गिकेवरून वाहतूक सुरू झाल्याने शहरातील वाहतूकीची समस्या बऱ्याच अंशी कमी होईल, असा विश्वासही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

नालेसफाईच्या कामांचा आढावा...

कल्याण डोंबिवली शहरात सुरु असलेल्या पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईकामांची देखील आमदार भोईर यांनी आज पाहणी केली. दुर्गाडी चौक येथील नाल्यापासून त्यांनी कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर रामबाग, संतोषी माता मंदिर रस्ता, शहाड, वालधूनी येथील नालेसफाईच्या कामांचा आढावा घेतला.