नागरिकांची तारांबळ रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नागरिकांची तारांबळ रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) :

मुंबई व उपनगरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईत सोमवारी रात्री झालेल्या पावसाने काही ठिकाणी दुर्घटना घडल्या तर काही ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची उडालेली तारांबळ रोखण्यासाठी बृहन्मुंबई मनपा, पोलीस यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणेने त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला मुख्यमंत्री श्री.फडणवीस भेट देऊन आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. शहरात झाडे पडणे, भिंत पडणे, पाणी साचणे अशा घटनांकडे मनपा, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यासह सर्व यंत्रणांनी बारकाईने लक्ष ठेवावे. प्रवाशांची तारांबळ होऊ नये यासाठी रेल्वे, बस, टॅक्सी वाहतूक त्वरित सुरळित करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. 

मनपाने शहरातील कचऱ्याचे १८ महिन्यात कंपोस्ट खतात रूपांतर होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान अवगत करावे. पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा होण्यासाठी सात पंपिंग स्टेशनपैकी माहुल (चेंबूर) व मोगरा (जोगेश्वरी) येथील पंपिंग स्टेशनचे काम सुरू नसल्याने ते मिशन मोडवर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी मुंबई मनपाने रस्ते सुरक्षेसाठी विकसित केलेल्या नवीन मोबाईल ॲपची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. हवामान अंदाजानुसार मुंबई, मराठवाडा, विदर्भात येत्या दोन-तीन दिवसात अतिवृष्टी होणार आहे, याचीही माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शहरात ठिकठिकाणी पाणी साचू नये यासाठी मनपाने केलेली व्यवस्था, शहरातील काही सखल भागात साचलेले पाणी पंपिंगद्वारे काढण्याच्या कामाची प्रगती याविषयी माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

शेख मिस्त्री दुर्गन रोड, दादर, अंधेरी सब वे, गांधी मार्केट, सायन, चेंबूर जंक्शन, भायखळा याठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक खोळंबल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे, याठिकाणी मनपाने संबंधित यंत्रणांच्या मदतीने पाणी उपसा केला आहे तर काही ठिकाणी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. सध्या हा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आयुक्त परदेशी व अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी मदत व पुनवर्सनमंत्री सुभाष देशमुख, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, डॉ. अश्विनी जोशी, पोलीस सहआयुक्त विनय चौबे, मनपा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.