अतिवृष्टीने उद्भवलेल्या मुंबई, कोकणातील परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा 

अतिवृष्टीने उद्भवलेल्या मुंबई, कोकणातील परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा 

मुंबई (प्रतिनिधी) : मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे मुंबईसह कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, तसेच विशेषत: कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने आढावा घेत आहेत. पुरपरिस्थिती असल्यास त्या त्या भागातील नागरिकांचे वेळीच स्थलांतर करावे व त्यांना कुठली गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले. बुधवारी रात्री पंतप्रधानांना देखील त्यांनी मुंबईतील परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळीही मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याकडून माहिती घेतली तसेच ते कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्र, मुंबई पालिका आयक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशीही बोलले व सुचना केल्या. भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी बोलून त्यांनी पुढील हवामानाचा काय अंदाज असेल व कशी तयारी करता येईल याविषयी चर्चा केली.

रेल्वे प्रवाशांची सुटका करणाऱ्या जवानांचे कौतुक

बुधवारपासून गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे १६२,३ मिमी, कुलाबा ३३१.०८ मिमी पाउस झालं. कुलाबा येथे बुधवारी सायंकाळी १०६ किमी प्रती तास इतका वाऱ्याचा वेग होता. तर इतरत्र हा वेग ७० ते ८० किमी प्रती तास होता. अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेली झाडे, विस्कळीत वाहतूक तसेच मदत कार्याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. कुर्ला येथे झाड अंगावर पडून एक व्यक्ती जखमी झाला असून ठिकठिकाणी पडलेली झाडे व फांद्या युद्धपातळीवर दूर करण्यात आल्याचे महापालिकेने सांगितले. बुधवारी मस्जिद बंदर येथे दोन उपनगरीय रेल्वेमधून २९० प्रवाशाना यशस्वीरीत्या बाहेर काढणाऱ्या रेल्वे पोलीस दलाच्या व एनडीआरएफ जवानांचे त्यांनी कौतुक केले. मस्जिद बंदर येथे मोटार पंपाचा शॉक लागून रेल्वेचा एक कर्मचारी मरण पावला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. 

पाण्याचा निचरा, पडलेली झाडे काढणे याला प्राधान्य

प्रथमच बुधवारी जेजे रुग्णालय येथे तळमजल्यावर पाणी भरले होते परंतु लगेचच यंत्रणेने त्या पाण्याचा निचरा करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास होऊ दिला नाही. त्याचप्रमाणे मुंबईत हिंदमाता, शेख मिस्त्री दर्गा रोड, बीपीटी कॉलनी स्काय वॉक, गोल देऊळ, महर्षी कर्वे रोड, पोलीस वसाहत, भायखळा, खेतवाडी आदी ठिकाणी साचलेले पाणी पालिकेने तात्काळ यंत्रणा कार्यान्वित करून काढले याविषयीही मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

शहरात १५ ठिकाणी घरांच्या भिंती पडण्याच्या तक्रारी आल्या आहेत. ३६१ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्या होत्या ते तोफ्डून रस्ता साफ करण्याचे काम सुरु आहे, ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. पेडर रोड ते केम्स कॉर्नर या मार्गावर संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली आहे त्याचीही माहिती त्यांनी घेतली.

कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना देखील सुचना

कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी येथील परिस्थितीचा त्यांनी पुणे विभागीय आयुक्त व कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडून माहिती घेतली व पुर परिस्थिती असल्यास त्या त्या भागातील नागरिकांचे वेळीच स्थलांतर करावे व त्यांना कुठली गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले. एनडीआरएफची राज्यात १६ पथके तैनात असून ४ पथके कोल्हापूरमध्ये आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. कोल्हापूरला पंचगंगा आणि रत्नागिरी येथे कोदवली, रायगड येथे कुंडलिका या  नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्क रहाण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.