मनात डिस्टन्स नसेल तरच शहराचा विकास होईल- आंमदार गायकवाड

मनात डिस्टन्स नसेल तरच शहराचा विकास होईल- आंमदार गायकवाड

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पूर्व भागातील विविध नागरी समस्यांबाबत स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गुरुवारी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीनंतर आमदार गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या कार्यक्रमात नुकत्याच केलेल्या वक्तव्याबाबत टिप्पणी करताना आ. गायकवाड म्हणाले की, मनामध्ये डिस्टन्स ठेवले नाही तर शहराचा चांगला विकासही होईल आणि चांगली कामेही होतील. आमदारांच्या या वक्तव्याने खासदारांवर निशाणा साधल्याचे स्पष्ट होत आहे.

कल्याण पूर्वेमध्ये असणाऱ्या कचरा, पाणी पुरवठा, पुना लिंक रोडवरील सतत तुटणारी झाकणं, गार्डनची व्यवस्थित न होणारी देखभाल दुरुस्ती, स्ट्रीट लाईट अशा विविध समस्यांबाबत आपली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा झाल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले. त्याचबरोबर १०० फूट रस्त्यावरील माधव अपार्टमेंटमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबतही यावेळी चर्चा झाली. ही इमारत तोडल्यावर १०० फूटी रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल. असेही आमदार यावेळी म्हणाले.

दरम्यान, कल्याण पूर्वेत रेल्वे परिसर असणाऱ्या ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे सुरू असून उर्वरित भाग ताब्यात आल्यावर त्या ठिकाणी देखील विकासकामे सुरू होतील, असा विश्वास आमदार गायकवाड यांनी व्यक्त केला. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केडीएमसीचा पदभार घेतला आणि पाठोपाठ कोरोनाची समस्या आली. त्यामुळे एवढे महिने नागरी समस्यांबाबत त्यांच्याशी नीट चर्चा करता आली नाही म्हणून आपण आज त्यांची भेट घेतल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी स्पष्ट केले.