केडीएमसी ऐवजी आम आदमी पक्षाने केले स्मशानभूमीच्या भिंतीचे बांधकाम

केडीएमसी ऐवजी आम आदमी पक्षाने केले स्मशानभूमीच्या भिंतीचे बांधकाम

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्मशानभूमीची संरक्षण भिंत पाडून शौचालयाचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र  हे बांधकाम लहान मुलांची हिंदू दफनभूमीच्या जागेवर होत असल्याने आणि संरक्षण भिंत तोडली गेल्याने या ठिकाणी भटके कुत्रे वगैरे येऊन प्रेत उकरण्याची शक्यता होती. आम आदमी पार्टीने ही बाब कल्याण डोंबिवली महापालिका (केडीएमसी) पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले अखेरीस आम आदमी पक्षाने या ठिकाणी स्वखर्चाने भिंत बांधण्यास शुक्रवारी सुरुवात केली. महापालिकेची संवेदनशून्यता या घटनेने समोर आली आहे.

कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी येथील हिंदू स्मशानभूमीची संरक्षण भिंत खाजगी ठेकेदाराने दोन महिन्यांपूर्वी पाडून तेथे शौचालयाचे बांधकाम सुरु केले होते. या प्रकाराला आम आदमी पक्षासह समाजातील असंख्य जागरूक नागरिकांनी विरोध दर्शविल्यानंतर ते काम बंद करण्यात आले. मात्र तेथे  हिंदू लहान मुलांची दफनभूमी असून संरक्षण भिंत पाडल्याने भटकी कुत्री वगैरे दफन केलेले प्रेत उकरून काढून त्याची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची गंभीर बाब आपने दहा दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाच्या लेखी पत्र देऊन निदर्शनास आणले होते. महापालिकेने दहा दिवसात ही तोडलेली संरक्षक भिंत बांधावी अन्यथा आम आदमी पार्टी ही भिंत बांधेल असा इशाराही त्या पत्रात दिला होता. मात्र प्रशासनाने सदर भिंत न बांधल्याने अखेरीस आम आदमी पक्षाने या ठिकाणी स्वखर्चाने भिंत बांधण्यास शुक्रवारी (आज) सुरुवात केली. 

आपचे कल्याण डोंबिवली महानगर अध्यक्ष धनंजय जोगदंड, राजेश शेलार, कल्पेश आहेर, सीमा तिवारी, सुरज मिश्रा, रवी जाधव, निलेश व्यवहारे, मिथिलेश झा आदी पदाधिकाऱ्यांनी जागेवर उभे राहून सदरच्या बांधकामाला आज सुरुवात केली. सदर कामाची निकड लक्षात घेऊन सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष विजय भोसले यांनी या कामासाठी सक्रीय योगदान दिले. दुपारी महापालिकेचे प्रभारी कार्यकारी अभियंता बरफ यांनी या बांधकामाच्या ठिकाणी भेट दिली. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाची संवेदनशून्यता समोर आल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.