गजबजलेली खडवली येथील भातसा नदी लॉकडाऊनमध्ये सुनसान

गजबजलेली खडवली येथील भातसा नदी लॉकडाऊनमध्ये सुनसान

खडवली (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरसमुळे पसरणाऱ्या कोविड१९ या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरासह राज्यात लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे उद्योग धंद्यांसह सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. खडवली येथून वाहणाऱ्या भातसा नदीवर डुंबण्यासाठी येणारे पर्यटकांचे घोळकेही बंद झाल्याने नेहेमी गजबजलेली असलेली येथील भातसा नदीचे किनारे लॉकडाऊनमध्ये सुनसान झाल्याचे चित्र आहे. परिणामी या पर्यटकांवर अवलंबून असलेले येथील उपाहारगृहादी व्यावसायिकांच्या उत्पन्नाचा मार्गही इतरांप्रमाणेच बंद झाला आहे.

कल्याण तालुक्यातील खडवली पश्चिम येथून वाहत जाणाऱ्या भातसा नदीवर दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटकांचे घोळके येत असतात. पर्यटकांच्या वर्दळीमुळे हे ठिकाण पर्यटक स्थळ म्हणून शासनाने घोषित केले आहे. मन वेधून घेणारा परिसर असल्याने येथे मुंबई-उपनगरासह ठाणे जिल्ह्यातील अनेक भागातून पर्यटक इथे येतात. विशेषत: उन्हाळ्यात होणाऱ्या उकाड्यामुळे काही काळ का होईना पाण्यात डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण ओळखले जाते. मात्र कोविड१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पर्यटकांचा खडवली येथे येणारे घोळके बंद झाले आहेत. 

पर्यटकच नसल्याने नदी किनारी असलेले हॉटेल्स, उपाहारगृह, ढाबे असे व्यवसाय पूर्णत: ठप्प झाले असून या व्यावसायिकांचे उत्पन्नच बंद झाल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील मर्द मराठा खानावळचे चालक तथा समाजसेवक मोहन रामचंद्र धोडविंदे हे गेली ४० वर्षांपासून नदी काठावर व्यवसाय करीत आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याबद्दल आपली व्यथा मांडताना ते की, आमचे व्यवसाय बंद झाल्याने आमच्यासह आमच्याकडे काम करणाऱ्या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची आमच्या मायबाप शासनाने दखल घेऊन आम्हाला उचित आर्थिक मदत करावी.