मुलांमधील कलागुणांना संधी देण्याचे दिव्याज फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद - मुख्यमंत्री

मुलांमधील कलागुणांना संधी देण्याचे दिव्याज फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद - मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : 
संगीत क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे, पण संधी मिळत नाही अशा मुलांना संधी मिळवून देण्याचे कार्य  दिव्याज फाऊंडेशनच्यावतीने होत आहे. मुलांना चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याज फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. दिव्याज फाऊंडेशनच्या ‘मिट्टी के सितारे’ या कार्यक्रमाच्या अंतिम फेरी बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थ  व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, ग्रॅमी पुरस्कार विजेता जेरी ओन्डा, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, संगीतकार अनु मलिक, अभिनेत्री मनीषा कोईराला, अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेते आणि गायक हिमेश रेशमीया आणि राजकीय, सामाजिक व कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

‘मिट्टी के सितारे’ या उपक्रमासाठी मुंबई महानगरपालिकेच्या विविध शाळांमधून ६०० विद्यार्थ्यांनी आपल्या कलांचे व्हिडिओ पाठवले होते. यानंतर ऑडिशन घेऊन १८ विद्यार्थी निवडण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना शंकर महादेवन अकादमीमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. या १८ विद्यार्थ्यांचे अंतिम फेरीसाठी ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ असे तीन ग्रुप करण्यात आले. अंतिम फेरीत पहिला पारितोषिक विजेता ग्रुप ‘ए’ हा तर दुसरा ग्रुप ‘सी’ ठरला. सर्व सहभागी मुलांना पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी फाऊंडेशनच्या संकेतस्थळाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.