शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पहिला तास

शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पहिला तास

ठाणे (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तब्बल पावणेदोन वर्षांनी शाळांची घंटा वाजली. शैक्षणिक सत्र सुरु होत असताना ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या नवीन शैक्षणिक पर्वाचा शुभारंभ स्वत: शाळेत उपस्थित राहत विद्यार्थ्यांचा तास घेऊन केला.

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोणतेही काम काटेकोरपणे करणे ही त्यांची खासियत आहे. आपली शैक्षणिक कारकीर्द पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. कोरोना नंतर शाळा सुरु होत असताना त्यांनी शाळेचा पहिला दिवस लक्षवेधी ठरविला. तब्बल ३८ वर्षानंतर आपल्या शाळेत जाऊन त्यांनी दहावीच्या वर्गावर तास घेतला. जिल्हाधिकारी नार्वेकर 'सरां'नी स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून देताना 'कर्ते सुधारक कर्वे' हा धडा शिकवला. स्वत: जिल्हाधिकारी आपला तास घेताहेत म्हटल्यावर विद्यार्थ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. जिल्हाधिकाऱ्यांनीही आपणाकडे शिकविण्याची हातोटी असल्याचे दाखवून दिले.