कुंडलिका नदीच्या पुराचा रोहा परिसराला फटका 

कुंडलिका नदीच्या पुराचा रोहा परिसराला फटका 

रोहा (प्रतिनिधी) : 
रोह येथील कुंडलिका नदीला आलेला पूर तब्बल २९ तासांनंतर ओसरल्याने परिसरातील विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. मधल्या काळात ठप्प झालेली वाहतूक रविवारी पहाटेपासून पूर्वपदावर आली आहे. रोहा आणि इतर भागाला या पुराचा चांगलाच फटका बसल्याने नागरिक हवालदिल झाले होते.

गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने येथील कुंडलिका नदीला शुक्रवारी मध्यरात्री पूर आला. नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आणि पुराचे पाणि रोहा शहरातील नदी काठच्या काही गावांत शिरले. मध्यरात्रीपासून नदीवरील पुलावरून काही फुटावरून पाणी वाहू लागल्याने पोलीस प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद केली होती. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने धाटाव एमआयडीसीमधील कामगारांना लवकर सोडण्यात आले. 

कुंडलिका नदीचे वाढलेले पाणी कधी ओसरते याची नागरिकांना काळजी लागली होती. नदी काठी सखल भागात नागरिकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण पसरले होते. रविवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान वाढलेली पाणी पातळी ओसरल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सुमारे २९ तास पुराचे पाणी नदी काठच्या परिसरात होते. त्यामुळे तेथील नागरिकांचे फारच हाल झाले. दरम्यान, भिरा व डोलवाहळ धरणातून पाणी सोडले जाण्याची भिती देखील व्यक्त करण्यात येत होती, मात्र तसे न घडल्याने फार मोठी हानी टाळल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पुराच्या पाण्याचा फटका बसलेल्या कुटुंबांना शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.