बांगलादेश युद्ध विजयाचा सुवर्ण महोत्सव आझाद मैदानात होणार साजरा

बांगलादेश युद्ध विजयाचा सुवर्ण महोत्सव आझाद मैदानात होणार साजरा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येत्या १६ डिसेंबरला बांगलादेश युद्धाला पन्नास वर्ष होत आहेत. हे निमित्त साधत महाराष्ट्र सैनिक फेडरेशनचे ५० हजार माजी सैनिक आझाद मैदानात एकत्र येत विजय दिन साजरा करणार आहेत. त्यावेळी केंद्र व राज्य सरकारने पाकिस्तान व बांगलादेश युद्धातील माजी सैनिक, वीर पत्नींचा सन्मान करावा, तसेच सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर शासकीय सेवेत नोकरीची हमी द्यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सावंतवाडी येथे एका पत्रकार परिषदेत जाहीर केले.

यावेळी महाराष्ट्र सैनिक फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष तातोबा गवस, सैनिक कल्याण अधिकारी पवार, विजय पाटील, समीर खानोलकर, दीपक शिर्के, दिगंबर नाईक तसेच अन्य सैनिक उपस्थित होते. यावेळी ब्रिगेडीयर सावंत पुढे म्हणाले की, देशासाठी सैन्यात लढत असताना पंधरा वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती दिली जाते त्यावेळी त्या सैनिकाचे वय ३३ किंवा ४० वर्षापर्यंत असते, नंतर ते पेन्शन वर उपजीविका होत नाही म्हणून शासनाच्या सेवेतील शिपाई, कारकून यांना ५८ वर्ष नोकरीची संधी दिली जाते. त्याचप्रमाणे सैनिकी निवृत्ती नंतर जवानांना शासकीय नोकरी सामावून घेतले पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

सैनिकांच्या कुटुंबाच्या जमीन बळकावणे, त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय करणे, सीमेवर न सैनिक असताना कुटुंबियांना त्रास देणे, असे प्रकार राज्यात घडत आहेत त्यासाठी फेडरेशन आवाज उठवत असल्याचे ब्रिगेडियर सावंत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिक व सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी एक समिती निर्माण करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र तशी समिती प्रशासनाने निर्माण केलेली नाही. सैनिक कल्याणासाठी लोक पैसे देतात. त्यापैकी अर्धा भाग मुख्यमंत्री व अर्धा शासनाने वापरावा आणि त्या माध्यतून माजी सैनिकांचे कल्याण करावे, असेही ते यावेळी म्हणाले.

सैनिक व माजी सैनिकांच्या मुलींसाठी वसतिगृह निर्माण करण्याचा संकल्प आहे. माजी सैनिकांच्या कल्याणासाठीचे कोट्यावधी रुपये शासन दरबारी पडून आहेत ते सैनिकांच्या कल्याणासाठी वापरावे. शिक्षक भरतीत चौदाशे राखीव जागा असूनही भरती केली जात नाही. पोलिसांमध्ये माजी सैनिकांना संधी दिली जात नाही. सरकारी सेवेमध्ये प्राधान्याने माजी सैनिकांची भरती करावी अशी मागणी करतानाच सुधीर सावंत यांनी केंद्र आणि राज्य सरकारने माजी सैनिकांसाठी व कुटुंबियांसाठी न्याय देण्यासाठी मानसिकता निर्माण करावी असे आवाहन केले.

भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली आहेत. बांगलादेश युध्द १९७१ मध्ये झाले होते. त्याला पन्नास वर्षे होत आहेत. येत्या १ ऑक्टोबरपासून स्वातंत्र्याची ७५ वर्ष आणि बांगलादेश युद्धाला ५० वर्ष पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र सैनिक फेडरेशन १६ डिसेंबर रोजी बांगलादेश विजय दिन ५० हजार माजी सैनिकांच्या उपस्थित आझाद मैदानावर साजरा करणार असल्याचे सांगितले. हे निमित्त साधून बांगलादेश युद्धामध्ये सहभागी झालेले सैनिक, वीरमाता आणि कुटुंबियांचा शासनाने सन्मान करावा, अशी मागणी करतानाच, महाराष्ट्र सैनिक फेडरेशन देखील सैनिक व कुटुंबियांचा सन्मान करणार असल्याची माहिती ब्रिगेडियर सावंत यांनी दिली.