भूमाफिया चीनच्या नांग्या ठेचण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा-  धनंजय जोगदंड 

भूमाफिया चीनच्या नांग्या ठेचण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा-  धनंजय जोगदंड 

कल्याण (प्रतिनिधी) :
चीन हा जगातील मोठा भूमाफिया देश आहे. भारतीय जवानांचा बळी घेणाऱ्या चीनच्या युद्धखोर प्रवृत्तीला रोखण्यासाठी त्याची आर्थिक नांगी ठेचण्याची वेळ आली आहे. भारत सरकारने चीन सोबतचे आर्थिक आणि व्यापारी संबंधासह सर्व प्रकारचे संबंध तोडावेत अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. कल्याण पूर्व येतील काटेमानिवली नाका येथे चीनी वस्तूंची तोडफोड करीत चीनच्या युद्धखोर प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला.

आपचे कल्याण लोकसभा अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी कल्याण येथील आंदोलन प्रसंगी बोलताना वरील मागणी केली. ते पुढे म्हणाले की, चीन त्याच्या भूभागा लगत असलेल्या तिबेट, मंगोलिया, तैवान, हॉंगकॉंग यासारख्या १४ देशांवर सतत हल्ले–आक्रमण करीत आहे. त्याची नजर भारताकडे वळली आहे. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी त्याच्या आर्थिक नांग्या तोडण्याची गरज असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भारतीय नागरिकांनीही या मुद्द्यावर सरकारच्या पाठी एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी चीनी बनावटीच्या वस्तू जसे एलसीडी टीव्ही, मोबाईल फोन, खेळणी यांची तोडफोड करण्यात आली. आपच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित नागरीकांनी चीनच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी रविंद्र केदारे, निलेश व्यवहारे, राजेश शेलार, राजू पांडे, कल्पेश आहेर, युवराज मोहिते,  तेजस चौधरी, शिवा साहू,  कौशिक काळे,   निलेश गवई,  सौ. चौधरी आदी आपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

शहीदांच्या कुटुंबांना महाराष्ट्र सरकारने मदत द्यावी 

चीनबरोबरच्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांना दिल्लीमधील केजरीवाल सरकारने १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील शहीद जवानांच्या कुटुंबांना १ कोटी रुपयांची मदत व कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी जोगदंड यांनी यावेळी केली.