आंबिवली येथील पूरग्रस्तांपर्यंत शासनाचा ‘मदतीचा हात’ पोहोचलाच नाही

आंबिवली येथील पूरग्रस्तांपर्यंत शासनाचा ‘मदतीचा हात’ पोहोचलाच नाही

आंबिवली (प्रतिनिधी) :
२६ जुलै व ४ ऑगस्ट रोजी पुरामुळे रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरून मालमत्तेचे नुकसान झाले होते. या पूरग्रस्तांसाठी कल्याण तालुक्यासाठी राज्य शासनाने १६ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र येथील अटाळी, वडवली, आंबिवली, गालेगाव व मोहने येथील पूरग्रस्तांना शासनाचा आर्थिक मदतीचा हात पोहोचला नसल्याने बहुतांश पूरग्रस्त कमालीचे हवालदिल झाले आहेत.

जुलै-ऑगस्ट महिन्यात दोन सत्रात पावसाचा जोर वाढल्याने नदी किनारी व अन्य सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले होते. राज्य शासनाच्या आदेशानुसार कल्याण तहसीलदारांकडून तलाठ्यांमार्फत पूरग्रस्तांचे सर्वेक्षण ही झाले होते. या सर्वेक्षणात शिधावाटप दुकानात धान्य देण्याचे ही फर्मान शासनाने काढले होते. मात्र पूरग्रस्त असणाऱ्या बहुतांश नागरिकांना धान्य देखील मिळाले नाही. पूरग्रस्तांची शिधावाटप दुकानात कल्याण तहसीलदार कार्यालयाकडून बहुतेक नावे वगळल्याने त्यांना मोफत धान्य मिळू शकले नाही. मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाल्याने एकीकडे पूरग्रस्त नागरिक मेटाकुटीला आले असतानाच मोहने-अंबिवली परिसरातील बहुतांश पूरग्रस्तांना पूरग्रस्त म्हणून मिळणारा १५ हजार रुपयांचा निधी अद्यापही मिळालेला नाही. चार महिन्यांचा कालावधी उलटूनही पूरग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेल्या १५ हजार रुपयांचा धनादेश बँकेत जमा न झाल्याने पूरग्रस्तांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे.

पूरग्रस्त म्हणून शिधावाटप दुकानदारांना शासनाने दिलेले मोफत धान्य पूरग्रस्तांना तर मिळालेच नाही ;अद्याप पर्यंत शासनाने दिलेल्या पंधरा हजार रुपयांची मदत देखील मिळालेली नाही. पूरग्रस्त परिस्थिती मध्ये अनेकांची महत्त्वाची कागदपत्रे पुरात वाहून गेली व खराब झाली मात्र अशा पूरग्रस्तांना कल्याण तहसीलदारांनी ना पूरग्रस्तांचे दाखले वाटप केले वा धनादेश वाटप केले.