ज्यांच्या हाती शहराचे आरोग्य, त्यांच्या हाती फाटलेले हँडग्लोव्हज

ज्यांच्या हाती शहराचे आरोग्य, त्यांच्या हाती फाटलेले हँडग्लोव्हज

कल्याण (प्रतिनिधी) : 
कोविड १९ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन नानाविविध प्रयत्न करीत आहे. मात्र ज्यांच्या हाती शहराचे आरोग्य आहे असे सफाई कर्मचारी एकीकडे फाटलेले हँडग्लोव्हज हातात घालून काम करीत आहेत तर दुसरीकडे अधिकारी मात्र ‘एसी’मध्ये N95 मास्क घालून काम करतात, हे चित्र विदारक आहे. त्यांना सुरक्षिततेची सर्व साहित्य त्वरित देण्यात यावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभा अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे नुकतीच केली आहे. त्याचप्रमाणे अशा सर्व कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि प्रोत्साहन भत्ता देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

महापालिकेच्या काही भागातून कोरोनाचे लक्षणीय संख्येने रुग्ण आढळून आले आहेत, तसेच संशयित रुग्णांचा आकडाही प्राप्त परिस्थितीत काळजी वाढविणारा आहे. असे असताना शासन व कल्याण डोंबिवली महापालिकाही नागरिकांना आरोग्याची कशाप्रकारे काळजी घ्यावी याविषयी सातत्याने सूचना करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात महापालिकेच्याच सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असून त्याला सबंधित महापालिकेचे अधिकारी प्रामुख्याने जबाबदार असल्याचा आरोप जोगदंड यांनी आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात केला केला आहे. 

सदर निवेदनात अधिकारी ‘एअर कंडिशन’मध्ये N95 मास्क घालून कारभार हाकताना तर दुसरीकडे सफाई कर्मचारी हातात फाटलेले हँडग्लोव्हज घालून कचरा उचलताना दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापालिकेच्या सफाई कामगारांकडील मास्क निकृष्ट दर्जाचे असून हा सगळा प्रकार धक्कादायक आहे. त्यांनाही N95 मास्क दिले गेले पाहिजेत. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची परिस्थिती देखील सारखीच आहे. सबंधित आरोग्य निरीक्षक/कंत्राटदार काय करीत आहेत, असा सवालही जोगदंड यांनी केला आहे. सफाई कर्मचारी, कचरावाहू गाड्यांवरील चालक, क्लीनर व इतर कामगारांना चांगल्या दर्जाचे मास्क, हँड ग्लोव्हज, सॅनिटायझर इत्यादी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावेत व त्यावर कटाक्षाने लक्ष देणेबाबत सबंधित आरोग्य निरीक्षकांना कडक निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

त्यांना विमाकवच आणि प्रोत्साहन भत्ता द्या!

कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या भागात देखील हे कर्मचारी जीवावरच धोका पत्करून काम करीत आहेत. शहराचे आरोग्य ज्यांच्या हातात आहे तेच सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य मात्र कोरोनाच्या सद्दीमध्ये अधिकच धोक्यात आहे. या सर्व महापालिका व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा महापालिकेने व कंत्राटदारामार्फत विमा काढण्यात यावा, तसेच कोरोंना सारख्या महामारीत आपले कर्तव्य बजावणाऱ्या महापालिकेच्या व कंत्राटी सफाई कर्मचारी, कचरावाहू गाड्यांवरील चालक, क्लीनर यांना प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात यावा, अशी मागणी जोगदंड यांनी केली आहे.