ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच तिरंगा डोंबिवलीत फडकला

ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच तिरंगा डोंबिवलीत फडकला

डोंबिवली (प्रतिनिधी) : भारताच्या ७२ प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधत ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच तिरंगा राष्ट्रध्वज डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर येथील संकलतिर्थ येथे फडकवण्यात आला. केवळ १५ दिवसात या दिडशे फुट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्याचे काम करण्या आले. मंगळवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. हा अभिमानाचा सोहोळा अनुभवण्यासाठी हजारो डोंबिवलीकरांनी हजेरी लावली होती.

यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कल्याण परिमंडळचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख तथा या कार्यक्रमाचे आयोजक राजेश मोरे, माजी महापौर विनिता राणे, नगरसेवक दिपेश म्हात्रे, तात्यासाहेब माने, सदानंद थरवळ, स्थानिक नगरसेविका भारती राजेश मोरे आदींसह शहरातील असंख्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

प्रथम शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. खा. शिंदे यांच्या हस्ते या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण होताच नागरिकांनी जयघोष करीत परिसर दणाणून सोडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचाही गौरव करण्यात आला. दिवंगत पत्रकार विकास काटदरे यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा सन्मान म्हणून त्यांच्या पत्नी श्रीमती काटदरे यांना ५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच कोरोना काळात धोका पत्करून आपले कर्तव्य पार पडणाऱ्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्यसेविका व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.