कल्याणमध्ये ऐतिहासिक तलावच गेला चोरीला; सामाजिक संस्थेचा आरोप

कल्याणमध्ये ऐतिहासिक तलावच गेला चोरीला; सामाजिक संस्थेचा आरोप

कल्याण (प्रतिनिधी) : नैसर्गिक जलस्रोतांचे जतन-संवर्धन करण्याचे शासनाचे धोरण असले, तरी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या (केडीएमसी) उदासीनतेमुळे कल्याण शहरातील ऐतिहासिक मानला जाणारा एक तलावच चोरीला गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. तीन वर्षांपासून याप्रकरणी कारवाईची मागणी करीत असतानाही महापालिका प्रशासन याबाबतीत ढिम्मच असल्याचा आरोप निर्भय सामाजिक सेवाभावी संस्थेचे प्रदेश अध्यक्ष जयपाल कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्या जवळच असलेल्या नॅशनल उर्दू शाळे लगत इतिहासकालीन भटाळे तलाव आहे. या तलावाचे जतन-संवर्धन करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. त्याचा लाभ उठवत मधल्या काळात काहींनी तलावाच्या जागेत भराव टाकून तेथे अतिक्रमण केले. अतिक्रमण केलेल्या जागेत तबेले बांधले गेले. आजमितीस तेथे ४ ते ५ तबेले आहेत. इतरही अतिक्रमणे तलावाच्या जागेत झाली आहेत. हा प्रकार शहरातील जागरूक नागरिक जयपाल कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याबाबत सन २०१८ पासून महापालिका प्रशासन, तहसीलदार कार्यालयाकडे पाठपुरावा चालविला आहे. मात्र प्रशासन याप्रकरणी केवळ कागदी घोडे नाचवत संबंधितांवर कारवाई करण्यात चालढकल करीत असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.

महापालिकेची संथ कारवाई...

दि. १९ मार्च २०१८ रोजी तत्कालीन अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या उपायुक्तांनी ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना या बाबत कारवाई करण्याचे पत्र पाठवूनही तेथील अतिक्रमण हटविण्यात आले नाही. सबंधित तबेले धारकांना जुलै २०१९ मध्ये तत्कलीन ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी चोवीस तासात सदरची अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात नोटीसा देखील काढल्या होत्या. तसेच याप्रकरणी उप अधीक्षक भूमि अभिलेख कल्याण यांच्याशी पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता.