शासनाच्या उदासीनतेमुळे बहुरूपी अन्य समाजापासून दुरावत आहे

शासनाच्या उदासीनतेमुळे बहुरूपी अन्य समाजापासून दुरावत आहे

भिवंडी (प्रतिनिधी) : आज भारतीय स्वातंत्र्य मिळाल्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. एवढ्या वर्षात समाजातील एक घटक असलेला बहुरूपी समाज मात्र उपेक्षिताचे जिणे जगत आहे. सरकारकडे बहुरूपी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही अनेकदा पत्रव्यवहार केला, मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे बहुरूपी अन्य समाजापासून दुरावत चालला आहे. ही धोक्याची घंटा आहे. त्याची वेळीच शासन-प्रशासनाने दखल घेऊन बहुरूपी समाजाला मुख्य सामाजिक प्रवाहात सामावून घेतले पाहिजे, असे आवाहन भटके बहुरूपी समाज सामाजिक संस्था, कोन या संस्थेचे अध्यक्ष करणनाथ व्यास यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित बांधवांशी संवाद साधताना केले. 

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कोन येथील वसाहतीत सुमारे १५० बहुरूपी समाजाची कुटुंबे राहतात. या कुटुंबांना संघटीत करून भटके बहुरूपी समाज सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. नुकताच संस्थेच्या वतीने सर्व समाज बांधवांना एकत्रित करीत एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी अध्यक्ष व्यास यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले की, बहुरूपी पुरुष मंडळी विविध पेहराव करून त्या माध्यमातून समाजात फिरून अर्थाजन करतो. हा त्यांचा व्यवसायच  आहे, मात्र लोक त्यांना नकली पोलीस संबोधतात, मात्र बहुरुपींच्या कपड्यांवर व पट्ट्यावर बहुरूपी असे स्पष्टपणे नमूद केलेले असते. आपली कला दाखवून त्यांच्या मिळणाऱ्या मोबदल्यात होणाऱ्या अर्थाजनातून बहुरूपी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. समाजाने ही बाब समजून त्यांना सहकार्य केले पाहिजे. तसेच शिक्षणाशी नाते तुटल्याने या समाजाची वाताहत सुरु आहे, ही खेदाची बाब असल्याचे ते म्हणाले. येथील वस्तीत आम्ही लहान मुलांसाठी शाळा चालवतो त्यासाठी आम्हाला मदतीची गरज असल्याचे सांगत व्यास यांनी शासनाने आम्हाला त्यासाठी मदत करावी, अशी मागणी केली. यावेळी संस्थेचे करणनाथ व्यास, धनंजय जोगदंड आदींच्या हस्ते वसाहतीमधील बालगोपाळांना शालेय साहित्य व कपडे यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.