विद्यार्थ्यांना सर्जनशील शिक्षण देणाऱ्या कोकणातील शिक्षक-संस्थांचा गौरव

विद्यार्थ्यांना सर्जनशील शिक्षण देणाऱ्या कोकणातील शिक्षक-संस्थांचा गौरव

कल्याण (प्रतिनिधी) : 
कोकणातील विद्यार्थ्यांना सर्जनशील, उपक्रमशील आणि नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून शिक्षण देणाऱ्या १०५ शिक्षक व शैक्षणिक संस्थांचा नुकताच गौरव करण्यात आला. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भाजप शिक्षण आघाडी कोकण विभागाच्या वतीने ठाणे येथे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून भाजप शिक्षण आघाडी कोकण विभागाच्या वतीने पुरस्कार दिले जात आहेत. यंदा शिक्षकांबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील जीवनगौरव, आदर्श संस्थाचालकांना गौरविण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. आर. डी. कुळकर्णी, आयसीटीचे रजिस्ट्रार प्रा. डॉ. आर. आर. देशमुख, आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, विजय जाधव, भाजप महिला आघाडीच्या माधवी नाईक, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, नीलिमा डावखरे, उद्योगपती कृतार्थ राजा, सचिन मोरे आदी उपस्थित होते. कोकणातील प्रयोगशील व नाविन्यपूर्ण कल्पना राबविणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचे आ. निरंजन डावखरे यांनी याप्रसंगी सांगितले.

सदर कार्यक्रमात पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष बी. डी. काळे यांना वसंत स्मृती जीवनगौरव पुरस्कार, वसंत स्मृती आदर्श शिक्षण संस्थाचालक म्हणून कल्याणच्या मोहोने येथील त्रिदल एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार प्रा. बी. एन. पाटील, कळवा येथील सहकार विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एच. एस. भानुशाली व ठाणे येथील महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सदाशिव देवकर यांना गौरविण्यात आले. त्याचबरोबर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०१  शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच ठाण्यात क्रिकेटपटू घडविणारे शशिकांत नाईक, थायलंडमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत पदके मिळविणाऱ्या ठाण्यातील स्टारफिश अकादमीच्या जलतरणपटूचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.