डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर पुल ऑगस्टअखेर वाहतुकीला होणार खुला 

डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर पुल ऑगस्टअखेर वाहतुकीला होणार खुला 

डोंबिवली ( प्रतिनिधी) : डोंबिवली पूर्व-पश्चिमेस जोडणारा कोपर उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा पूल ऑगस्ट अखेर वाहतुकीसाठी खुला होणे अपेक्षित असल्याची माहिती डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी दिली आहे.

डोंबिवली पूर्व-पश्चिमेस जोडणारा कोपर उड्डाणपूल आयआयटी, मुंबई यांच्या अहवालानुसार मध्य रेल्वेने दि. १५ सप्टेंबर २०१९ रोजी बंद केला. माहे एप्रिल २०२० मधे, मध्य रेल्वेची वाहतूक बंद असताना रेल्वेवरील जूना स्लॅब तोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर २०२० पर्यंत रेल्वे प्रशासनाद्वारे पूलाचे बिअरिंग व गर्डर दुरूस्तीचे काम करण्यात आले. दरम्यान, रेल्वेलगत पूर्व बाजूच्या पोहोच रस्त्यावरील गर्डर व स्लॅबचे नकाशे तयार करून आयआयटी, मुंबई यांचेकडून तपासून घेण्यात आले. मंजूर विकास आराखडयामध्ये कोपर पूल १८ मी. डी.पी. रस्त्यावर आहे. या पूलाच्या पोहोच रस्त्याचे बांधकाम करण्याकरीता लगत असणारी बांधकामे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमा प्रमाणे कारवाई करून जानेवारी २०२१ मध्ये निष्कासित करण्यात आली. तसेच पोहोच रस्त्यामधे असलेले गर्डर उभारण्याचे काम ३ मेमध्ये २०२१ रोजी पूर्ण करण्यात आले. 

सदर प्रकल्प अतिकुशल व महत्वाचा प्रकल्प असल्यामुळे कामादरम्यान वेळोवेळी चाचणी करणे आवश्यक होते. त्यानुसार गर्डरचा स्लॅब भरण्यापूर्वी गर्डरमध्ये बसविण्यात आलेल्या एकूण ८७५८ नट बोल्टची तपासणी महापालिका अधिकारी व त्रयस्थ तांत्रिक लेखा परिक्षक यांच्याकडून करण्यात आली. सदर पोहोच रस्त्यावरील स्लॅबची Reinforcement बांधण्याचे काम पूर्ण झालेले असून त्याची तपासणी महापालिका अधिकारी व त्रयस्थ तांत्रिक लेखा परिक्षक यांचेमार्फत सुरू आहे. तपासणीत आढळून आलेल्या बाबींची पूर्तता करून जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात सदर स्लॅब भरण्यात येणार आहे. त्यानंतर २८ दिवसानंतर तांत्रिक मापदंडानुसार सदर पूल वाहतूकीसाठी सुरू करता येईल. या २८ दिवसांच्या दरम्यान उर्वरित कामे जसे विद्युतीकरण व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातील इतर कामे करण्यात येणार असल्याची माहिती सबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे..

सद्या सुरू असलेल्या पावसाळ्याच्या कालावधीत स्लॅब भरताना अधिक सुरक्षा व खबरदारी घेण्याच्या दृष्टकोनातून नियोजन करण्यात आले आहे. परंतू पावसाळी वातावरणात पोहोच रस्त्यावर केलेल्या भरावावर डांबरीकरण करणे तांत्रिकदृष्टया अनुज्ञेय नाही. सदर प्रकल्प कोविड कालावधीत सुरू असल्याने याकरीता लागणारे बांधकाम साहित्य जसे लोखंड, ऑक्सीजन तसेच वाहतूक व्यवस्था व मनुष्यबळ यांची उपलब्धता मुबलक प्रमाणात नव्हती. त्यामुळे प्रकल्प अपेक्षित कालावधीत पूर्ण करण्यात बाधा आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आजमितीस रेल्वे भागातील महावितरणच्या दोन उच्च दाब विद्युत वाहिन्या मध्य रेल्वेने इतर ठिकाणी स्थलांतरीत केल्या नाहीत. महापालिकेद्वारे वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर ही बाब मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बैठकीमध्ये सुचित करण्यात आली असून त्यावर मध्य रेल्वेमार्फत कार्यवाही सुरू आहे. सदर कामाबाबत माहिती देताना कल्याण शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी सदर पूल ऑगस्ट अखेर सुरू होणे अपेक्षित असल्याचे सांगितले.