बल्याणीत प्रशासनाचे आदेश धुडकावून रात्री दहापर्यंत बाजारपेठ खुली

बल्याणीत प्रशासनाचे आदेश धुडकावून रात्री दहापर्यंत बाजारपेठ खुली

कल्याण (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून प्रशासनाकडून महापालिका क्षेत्रातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेतच सुरु ठेवण्याचे निर्देश दुकानदारांना देण्यात आले आहेत. मात्र टिटवाळा नजीकच्या बल्याणी प्रभागातील बाजारपेठेत हा नियम धुडकावून तेथील दुकाने मोठ्या संख्येने रात्री दहापर्यंत सुरु ठेवण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.

कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात येत आहेत. नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार वेळोवेळी सूचनाही दिल्या जात आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून याबाबतचे निर्देश-निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु ठेवण्याच्या सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहे. महापालिका क्षेत्रातील बहुतांशी भागात ही सूचना पाळली जात असताना टिटवाळा नजीकच्या बल्याणी येथील बाजारपेठेत हा नियम धुडकावून तेथील संख्येने दुकाने मोठ्या संख्येने रात्री साधारणत: दहापर्यंत सुरु ठेवण्यात येत आहेत. या दुकानांमधील विक्रेते-कर्मचारी सामाजिक अंतराचेही पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरु असल्याची माहिती स्थानिकांनी देण्यात आली.

सकाळी ९.०० ते ७.०० या निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा रात्री उशिरापर्यत दुकाने उघडी ठेवणा-या दुकानांवर कारवाई करण्याची गरज असताना त्याकडे ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांचे तसेच पोलीस प्रशासनाचे कोणतेही लक्ष नसल्याचे दिसत आहे. महत्वाचे म्हणजे सोमवारी घेतलेल्या महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना उशिरापर्यंत उघडी राहणारी दुकाने व सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या दुकानदारांविरोधात, मास्क न लावणाऱ्यां नागरिकांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिलेल्या असतानाही मंगळवारी रात्रीही साडेनऊ-दहापर्यंत बल्याणी येथील दुकाने सुरु ठेवली गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.