केडीएमटीची वाटचाल खाजगीकरणाकडे ?

केडीएमटीची वाटचाल खाजगीकरणाकडे ?

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची परिवहन उपक्रम (केडीएमटी) ग्रोस कॉस्ट काँट्रॅक्ट (जी.सी.सी.) तत्वावर चालविण्यास देण्याबाबत शासनाने आदेशित केले. त्यामुळे महापालिकेचा परिवहन उपक्रमाची वाटचाल खाजागीकरणाकडे होण्याचे संकेत आहेत. लवकरच हा उपक्रम खाजगी ठेकेदारांच्या हाती जाण्याची शक्यता वाढली आहे.

परिवहन उपक्रम सध्या मोठ्या प्रमाणात तोट्यात चालविला जात असून खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून वार्षिक देखभाल दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्याचेही ४ कोटी रुपयांचे बिल थकल्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या कामाची गती मंदावल्याची चर्चा आहे. टायर, स्पेअर पार्टस, बेटऱ्या आदी वाहनाच्या आवश्यक सामानांची कोट्यावधीची बिले देणे थकीत असल्याने सबंधित ठेकेदार पैशाचा तगादा करीत आहेत. दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेल्या कर्ज, विमा, सोसायट्या, प्रोव्हीडत फंडाच्या रकमांचा भरणाही वेळीच होऊ शकत नाही. त्यातच ह्या उपक्रमातील कामगार-कर्मचारी-अधिकारीवर्गाचे पगार दोन-दोन महिने होत नसल्याने कामगारवर्गही धास्तावलेला आहे. महसुली उत्पन्नामध्ये होत असणारी घट व वाढता महसुली खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने महापालिका प्रशासन पगार खर्चाबाबत कपातीचे सूत्र राबवीत आहे.

परिवहन उपक्रमातील असंख्य बसेस ८-१० वर्षे जुन्या असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च उपक्रमाला परवडेनासा झाला आहे. उपक्रमाचे उत्पन्न वाढविण्याच्या परिवहन उपायुक्त मारुती खोडके यांचे प्रयत्नाला प्रतिसाद मिळत नसल्याने व महापालिकेकडूनही उपक्रमाला आर्थिक मदत पुरेशी मिळत नाही. उपक्रमाच्या सद्य स्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आल्याचे समजते. शासनाचे जेएनएनउआरएम अंतर्गत ८ कोटी रुपये महापालिका प्रशासनाकडून चुकते झाले नसल्याने व शासनाशी केलेल्या सामंजस्य कराराप्रमाणे महापालिका प्रशासन सहकार्य करीत नसल्याप्रकरणी परिवहन समितीचे माजी सभापती सुभाष म्हस्के यांनी शासनाकडे केली होती.

एकंदरीत सर्वच परिवहन उपक्रमाची सेवा तोट्यात चालत असल्याने ह्या उपक्रमाबाबत महापालिका प्रशासनाने जीसीसी धर्तीवर हा उपक्रम राबविण्याबाबत विचार करणेकामी अधिकार महापालिकेला दिले आहे.