टिटवाळा-आंबिवलीत शेकडो फेरीवाल्यांवर महापालिकेचा कारवाईचा बडगा

टिटवाळा-आंबिवलीत शेकडो फेरीवाल्यांवर महापालिकेचा कारवाईचा बडगा

आंबिवली (सिद्धार्थ गायकवाड) :
डोंबिवली येथे फेरीवाल्यांमध्ये हाणामारीची घटना घडल्यानंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने फेरीवाला हटाव मोहीम हाती घेत कल्याण-डोंबिवली परिसरात जोरदार कारवाई सुरु केली. महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा-आंबिवली परिसरातील पदपथ-रस्त्यांवर वर्षोनुवर्षे फेरीवाल्यांनी ठाण मांडलेल्या शेकडो फेरीवाल्यांवर देखील महापालिकेने सोमवारी कारवाईचा बडगा उगारत त्यांना हटवत पदपथ-रस्ते मोकळे केले. मात्र महापालिकेचे पथकाची पाठ फिरताच फेरीवाल्यांनी काही ठिकाणी बस्तान मांडल्याने तेथे पाठशिवणीचा खेळ सुरु झाला आहे.

टिटवाळा-आंबिवली परिसरात वर्षोनुवर्षे पदपथ-रस्त्यांवर शेकडो फेरीवाल्यांनी ठिकठिकाणी ठाण मांडले आहे. ‘ना फेरीवाला क्षेत्रातदेखी बिनदिक्कतपणे फेरीवाल्यांनी कब्जा करीत व्यवसाय चालविला आहे. प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोमवारी धडक कारवाई कारवाई केली. पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान मांडू नये यासाठी अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या जेसीबीने तोडण्यात आल्या. मोहने पोलीस चौकी ते आंबिवली स्टेशन परिसरात गेल्या अनेक वर्षापासून फेरीवाल्यांनी रहदारीच्या छोट्याशा रस्त्यावर अतिक्रमण करून आपली अनधिकृतपणे दुकाने उभी केली होती. पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्यावर बिनधास्तपणे वाहतूक कोंडी करत होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांच्या  पथकाने कारवाई केली. या कारवाईत स्टेशन परिसरातील अटाळी विभागही सुटला नाही. 

आंबिवलीहुन टिटवाळाकडे  जाणाऱ्या रस्त्यावर फेरीवाल्यांमुळे व वेडीवाकडी वाहने पार्क करण्यामुळे सतत वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे जिकरीचे झाले होते. रस्त्यावरील दुतर्फा भागात काही फेरीवाल्यांनी मोठे तंबू ठोकले होते, तर काहींनी हात गाड्या लावल्या होत्या. या फेरीवाला हटाव कारवाईबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत असले, तरी किती दिवस पदपथ-रस्ते फेरीवाला मुक्त राहतील असा प्रश्नही यानिमित्ताने मागील अनुभवावरून केला जात आहे.

दरम्यान, काही ठिकाणी अतिक्रमण निर्मुलन पथकाने फेरीवाल्यांवर कारवाई केल्यांनतर या पथकाची पाठ फिरताच काही ठिकाणी फेरीवाल्यांनी पुन्हा पदपथ-रस्त्यांवर बस्तान मांडण्यासाठी सरसावल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. त्यांना हटवण्यासाठी अतिक्रमण निर्मुलन पथकाला सातत्याने कारवाई करावी लागत आहे. यामुळे पथकाचे कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये चाललेला पाठशिवणीचा खेळ नागरिकांना पाहायला मिळत आहे.