एनआरसी कामगारांच्या देणीप्रकरणी पुढील बैठक दिल्ली येथे घेणार - रामदास आठवले

एनआरसी कामगारांच्या देणीप्रकरणी पुढील बैठक दिल्ली येथे घेणार - रामदास आठवले

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण जवळील एनआरसी कंपनी बंद झाल्याने बेरोजगार झालेल्या हजारो कामगारांच्या थकबाकी व अन्य प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बुधवारी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावली होती. बैठकीला अन्य शासकीय. विभागांचे वरिष्ठ अधिकारी-प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र कंपनी व्यवस्थापन आणि अदानी उद्योग समूहाचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने ही बैठक निष्फळ ठरली. आठवले यांनी पुढील बैठक दिल्ली येथे बोलाविणार असल्याचे सांगत एनआरसी कामगारांना न्याय मिळवून देऊ, असे स्पष्ट केले.

एनआरसी कंपनी बंद होऊन सुमारे १३ वर्षं उलटली. मधल्या काळात कंपनीची सुमारे ३५० एकर जमीन अदानी उद्योग समूहाने खरेदी केली. मात्र कंपनीने कामगारांचे थकीत वेतन, भविष्य निर्वाह निधी व इतर देय देणी न दिल्याने कामगारांवर अन्याय होत आहे. याप्रकरणी एनसीएलटी (दिल्ली) लवादाकडे सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे, कामगार न्याय मिळविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाचे उंबरठे झिजवत आहेत. काही कामगारांनी केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांना न्याय मिळवून देण्यासाठी साकडे घातले. त्यानुसार आठवले यांनी बुधवारी मुंबईत सर्व संबंधित व सर्व कामगार संघटनांची एकत्रित बैठक बोलावली होती. बैठकीला ठाण्याचे उपजिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त, जिल्हा निबंधक सहकारी  संस्था, ठाण्याचे कामगार आयुक्त, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अधिकारी व इतर शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मात्र बैठकीला कंपनी व्यवस्थापन आणि अदानी उद्योग समूहाचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने ही बैठक निष्फळ ठरली. यावेळी रामदास आठवले यांनी सकारात्मक भूमिका घेऊन कामगारांना  न्याय मिळणेकामी सर्वं प्रकारचे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पुढील बैठक आता दिल्ली येथे घेऊ. त्यावेळी कंपनी व्यवस्थापन आणि अदानी उद्योग समूहाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील असे पाहू, अशी त्यांनी खात्री दिली.

यावेळी कामगारांच्या वतीने जे. सी. कटारिया, उदय चौधरी, सुभाष पाटील, अविनाश नाईक, भीमराव डोळस, दासू ठोंबे यांनी प्रलंबित प्रश्नांबाबत राज्यमंत्र्यांना माहिती दिली. याप्रसंगी माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, रामदास वळसे, अर्जुन पाटील, सुरेश पाटील, फरीदा  पठाण, आदी उपस्थित होते.