मलंगगड-ढोके येथील जुना पूल आमदार गायकवाड यांच्या सूचनेनंतर जमीनदोस्त

कल्याण (रघुवीर सुरळकर) :
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्ट्यातील ढोके गावाला जोडणाऱ्या मलंगगड नदीवरील जुन्या पुलाभोवती झाडांच्या फांद्यांच्या व इतर अडथळ्यामुळे नदीतील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याने ढोके गावाला पुराचा धोका निर्माण झाला होता. मात्र पुल कोणाच्या हद्दीत येतो या मुद्यावरून दोन सरकारी विभागांमध्ये वाद सुरु होता. अखेरीस स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी पाहणी करीत जुना पूल तोडण्याचे सरकारी यंत्रणांना सक्त सूचना केल्यानंतर अखेरीस तो जमीनदोस्त करण्यात आला.
कल्याण-अंबरनाथ पट्ट्यातील मलंगगड पट्ट्यात मलंगगड नदीवर ढोके गावाला जोडणारा जुना पूल धोकादायक झाल्याने काही वर्षांपूर्वी नवीन पूल बांधण्यात आला होता. मात्र जुना पूल न तोडता तसाच ठेवण्यात आला होता. त्याची देखभाल केली जात नसल्याने जुन्या पुलाला झाडांच्या फांद्यांनी वेढले होते. पावसाला सुरु झाल्याने मलंगगड नदी दुथडी भरून वाहू लागली. मात्र जुन्या पुलाला झाडाच्या फांद्यांनी वेढल्याने नदीतील पाणी वाहून न जाता ढोके गावात शिरण्याचा धोका निर्माण झाला.
सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसाने मलंगगड नदीला पूर आल्याने गावकऱ्यामध्ये काळजीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे जुना पूल तोडण्याची मागणी पुढे आली. मात्र पूल कोणाच्या अखत्यारीत येतो यावरून राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. अखेरीस कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी ग्रामस्थांसह जुन्या पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित संबधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ जुना पूल तोडण्याच्या सुचना दिल्या. सोमवारी उशिरा सदरचा पूल पोकलेनच्या मदतीने तोडून मलबा बाजूला करण्यात आला. यावेळी आ. गायकवाड यांनी ढोके गावाला भविष्यात पुराच्या पाण्याचा धोका होऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधण्याचे आश्वासनही दिले.