महापौरांनी दिलेली डेडलाईन संपूनही वडवली रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न रखडलेलाच !

महापौरांनी दिलेली डेडलाईन संपूनही वडवली रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न रखडलेलाच !

टिटवाळा (प्रतिनिधी) : 
मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील शहाड आंबिवली स्थानका दरम्यान असलेल्या वडवली येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम गेल्या आठ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. परिणामी वडवली ४७ रेल्वे गेट  फाटक बंद असताना अनेकदा फाटकाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या दुतर्फा रांगा लागत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सोमवारी देखील असाच प्रकार घडून सुमारे तासभर फाटकात वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने वडवली रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरु करून तब्बल ८ वर्षाहुन अधिक काळ लोटला आहे तरी सदर या उड्डाणपूलाचे काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे उड्डाणपुलाचे काम रखडल्याचा आरोप जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यातच रेल्वे प्रशासनाने महापालिकेला आम्ही  वडवली रेल्वे ४७ गेट कधीही बंद करू अशा आशयाचे पत्र दिले आहे. वडवली ४७ रेल्वे गेट येथे होणारी वाहतूक कोंडी व कधी कधी वाहनांच्या वर्दळीमुळे रेल्वे वाहतूक सेवा कोलमडण्याचे प्रकार अनेकदा घडतात. असाच प्रकार सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास फाटकांच्या दुर्तफा झालेल्या वाहनांच्या गर्दीमुळे तासभराहुन अधिक काळ वाहतुक कोंडी झाली. परिणामी वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. अशा वाहतुक कोंडीच्या घटनेत रूग्णवाहिकेमधुन अत्यव्यस्त रुग्णाला रूग्णालयात नेताना त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

दरम्यान, यापूर्वीच्या काही आयुक्तांनी व विद्यमान महापौर विनिता विश्वनाथ राणे यांनीही या उड्डाणपुलाला भेट देऊन पाहणी केली होती. महापौर राणे यांनी कंत्राटदाराला दिलेली मे महिन्याची डेडलाईन देखील उलटून गेली आहे. येथील स्थानिक आजी माजी नगरसेवकांनी अनेकदा या रखडलेल्या उड्डाणपुलासंदर्भात महापालिकेच्या महासभेत आवाज उठवूनही त्यांना उड्डाणपुलाचे काम पूर्ण करून घेता आलेले नाही. दरम्यान, प्राणवायू सामाजिक संघटनेने देखील याप्रकरणी आपले सरकार या महाराष्ट्र शासनाच्या वेबपोर्टल वर तसेच मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून सबंधित जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली, तरी त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वडवली रेल्वे उड्डाणपूलाचा प्रश्न केव्हा मार्गी लागेल व आंबिवली-टिटवाळा परिसरातील नागरिकांची येथील वाहतूक कोंडीतुन सुटका होईल असा सवाल नागरिक करीत आहेत.

के ३ प्रवाशांची संघटनेचे पदाधिकारी विजय देशेकर यांनी सांगितले की, वडवली रेल्वे फाटकात होणाऱ्या वाहतुक कोंडीला बेशिस्त वाहनचालक जबाबदार असुन वाहतुक कोंडीमुळे रेल्वे वाहतूकीवर देखील परिणाम होऊन रेल्वे विलंबाने धावते. वाहनचालकांनी शिस्तीने वाहन चालवीत वाहतूक कोंडी होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.